पश्चिम बंगाल या ठिकाणी संदेशखाली येथील हिंसेवरुन आणि महिलांवरच्या अत्याचारांवरुन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांचा संताप आणि तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. धर्म आणि वय पाहून महिलांवर अत्याचार केले जातात. जगात असं कुठेही घडत नाही. भाजपाचा कार्यकर्ता आहे म्हणून कुणाचीही हत्या केली जाते हे दुर्दैवी आहे असंही स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाल्या स्मृती इराणी?
“संदेशखाली मध्ये जे झालं ते भारतीयच नाही तर कुठल्याही माणूस म्हणून जगणाऱ्याच्या विचारांच्या विरोधातलं आहे. पश्चिम बंगालच्या संदेशखालीमध्ये जेव्हा हिंसाचार झाला तेव्हा मी म्हटलं होतं की तिथे असं वाटतं की भाजपाचा कार्यकर्ता आहे तर त्याची हत्या सहजपणे केली जाऊ शकते. पश्चिम बंगालमध्ये जर भाजपाची महिला कार्यकर्ता आहे तर तिला घरुन उचललं जाऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला जाऊ शकतो. भाजपा युवा मोर्चाचा कार्यकर्ता असेल तर त्याला शेतात झाडाला टांगून ठार केलं जाऊ शकतं. आम्ही भाजपातून आहोत त्यामुळे आम्हाला जर तिथे ठार केलं जात असेल तरीही आम्ही शांत बसायचं कारण आम्ही ही अन्यायाविरोधात लढण्याची किंमत मोजतोय असं म्हणून सगळे शांत राहतात. संदेशखालीमध्ये जे आहेत ते भाजपाचे नाहीत. ममता बॅनर्जींना ज्यांनी निवडून दिलं त्या महिलांवरही बलात्कार झाला. ममता बॅनर्जींना हे माहीतच नाही की तिथल्या स्त्रियांचं अपहरण त्यांचा धर्म पाहून आणि त्यांचं वय पाहून केलं गेलं. ” असं स्मृती इराणी म्हणाल्या.
पुढे याच मुद्द्यावर त्या म्हणाल्या, “विषण्ण करणारी बाब ही आहे की पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे लोकही गेले होते. त्यांचीही हत्या करण्यात आली ही बाब दुर्दैवी आहे. काँग्रेसच्या लोकांनाही संवादच साधायचा होते. मात्र त्यांचे युवराज जे राजकीय चक्रव्युहात अजूनही स्वतःला शोधत आहेत त्यांच्याकडे या विषयावर भाष्य करण्याठी एक शब्दही नाही.” असंही स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. टीव्ही ९ च्या ग्लोबल समिटमध्ये स्मृती इराणी यांनी हे वक्तव्य केलं आहे.
हे ही वाचा- केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी पोस्ट केला मॉडेलिंगच्या दिवसातला ‘तो’ फोटो, नेटकरी म्हणाले…
महिलांना अर्थव्यवस्थेत बरोबरीचं स्थान दिलं ते पंतप्रधान मोदींनी
मोदींनी महिलांना अर्थव्यवस्थेत बरोबरीची भागिदारी दिली. स्त्रियांचं हित कसं साधता येईल आणि त्यांना बळ मिळेल असे अनेक कार्यक्रम मोदींनी राबवले आहेत. लखपती दीदीपासून ते ड्रोन दीदी पर्यंतच्या अनेक योजना मोदींनी आणल्या. गुजरातचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान म्हणून मोदी यांना काम करताना पाहण्याचं मला भाग्य मिळालं. आज भारतातील महिला जगात आपला नावलौकीक मिळवत आहेत. भारताच्या नारीशक्तीचं वैभव जगाने पाहिलं आहे, असं स्मृती इराणी म्हणाल्या.