पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना निर्णय घेण्यासाठी पूर्णपणे स्वातंत्र्य देतात आणि प्रोत्साहितही करतात, या शब्दांत माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी मोदी यांचे समर्थन केले. मोदी सरकार सत्तेवर आल्याला मंगळवारी १०० दिवस पूर्ण झाले. त्या पार्श्वभूमीवर बोलताना जावडेकर यांनी मोदींवर करण्यात येणारे आरोप स्पष्टपणे फेटाळले.
ते म्हणाले, नव्या सरकारमुळे धोरण लकवा संपुष्टात आला आहे. मोदी आम्हाला निर्णय घेण्यासाठी आवश्यक स्वातंत्र्य देतात. त्यांचे केवळ एकच म्हणणे असते, सर्वांचे ऐकून घ्या आणि शेवटी देशाचे हित होईल, असा निर्णय घ्या. निर्णय घेण्यासाठी ते आम्हाला प्रोत्साहितही करीत असतात.
मोदी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठीच काही जणांकडून त्यांच्याबद्दल खोटी माहिती पसरविण्यात येते आहे, असे सांगून जावडेकर म्हणाले, लोकांनी आम्हाला पाच वर्षांसाठी सत्ता दिली आहे. १०० दिवसांसाठी नाही. केंद्र सरकारमधील सर्व विभागात निर्णय प्रक्रिया वेगवान झाली आहे. गेल्या १०० दिवसांत पेट्रोलचे भाव दोन वेळा कमी करण्यात आले. त्याचबरोबर इतरही जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करण्यासाठी पावले टाकण्यात आली आहेत.

Story img Loader