संतोष प्रधान
मंत्र्याच्या जावयाला उमेदवारी देण्याच्या विरोधात कर्नाटकात काँग्रेसच्या पाच आमदारांनी बंडाचे निशाण फडकवत थेट राजीनाम्याचा इशारा दिल्यावर काँग्रेस नेतृत्वाची झालेली धावपळ या राजकीय घडामोडींवरून देशातील विविध राज्यांमधील मंत्र्याना लोकसभेची उमेदवार कशी नकोशी याचे वास्तव समोर आले. कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे गृह राज्य. साहजिकच या राज्यातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचे काँग्रेसचे उद्दिष्ट असणार. यासाठी पक्षाच्या काही मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याचा घाट घालण्यात आला. पण बंगळुरूमधील प्रशस्त बंगले, गाडया, नोकरचाकर, मंत्रिपदाचे मिळणारे ऐहिक सुख सोडून लोकसभेत जाण्याची कोणत्याच मंत्र्याची तयारी नव्हती. पण मतदारसंघातील उमेदवार तर निवडून आला पाहिजे हा पक्षाचा आदेश. मग बहुतेक मंत्र्यांनी आपली मुले, जावई, सूना यांची नावे उमेदवारीसाठी पुढे केली. त्यातूनच कोलार मतदारसंघातून मंत्र्याने जावयाच्या उमेदवारीची मागणी केली. यावरूनच पुढील सारे रामायण घडले. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने पाच ज्येष्ठ मंत्र्यांनाच लोकसभेची उमेदवारी जाहीर करून टाकली.
हेही वाचा >>> राजकीय अस्वस्थता कायम; महायुती, महाविकास आघाडीमध्ये तणाव
चांगली खाती भूषविणारे हे सारे मंत्री. मंत्रिपदी असल्याने चंडिगडमध्ये किमान मानमरातब तरी मिळतो. दिल्लीत जाऊन काय दिवे लावणार ? पण पक्षाच्या आदेशापुढे कोणाला विरोधही करता येत नाही. पण लोकसभेची उमेदवारी दिलेले सर्वच मंत्री काही दिल्लीस जाण्यास उत्सूक नव्हते, असे कळते. महाराष्ट्रात सुधीर मुनगंटीवार यांनाही तोच अनुभव. गिरीश महाजन यांनी स्वत:ची सुटका करून घेतली, पण मुनगंटीवार यांच्या गळयात लोकसभेची उमेदवारी पडली. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या जतिन प्रसाद यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली होती. जरा कुठे बरे चालले होते तर पिलभीत मतदारसंघातून वरुण गांधी यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने प्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनाही अनिच्छेनेच लोकसभेच्या रिंगणात उतरावे लागत आहे. केरळातही डाव्या आघाडी सरकारमधील एका मंत्र्याला लोकसभेच्या रिंगणात उतरविले आहे. दिल्लीत जाण्यास राज्यातील कोणत्याच मंत्र्याची तयारी नसते. राज्यातील छगन भुजबळ आणि धर्मरामबाबा आत्राम या अजित पवार गटाच्या दोन मंत्र्यांची लोकसभा लढण्याची तयारी होती. पण गडचिरोलीची जागा भाजपने सोडण्यास नकार दिल्याने आत्राम यांचा नाईलाज झाला. भुजबळांची इच्छा पूर्ण होते का हे थोडयाच दिवसांत समजेल.