दारुच्या नशेत असल्याने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना जर्मनीच्या फ्रँकफर्ट विमानतळावर विमानातून उतरवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या आरोपांची चौकशी करणार असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली आहे. “आम्हाला या प्रकरणातील तथ्य तपासावे लागणार आहेत. घटनेचा तपशील देणे हे लुफ्तान्सा एअरलाईन्सवर अवलंबुन आहे”, असे सिंधिया यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दारुच्या नशेत असल्याने मुख्यमंत्री भगवंत मान यांना विमानातून खाली उतरवलं? आरोपांमुळे खळबळ

भगवंत मान यांच्यामुळे ‘लुफ्तांन्सा’ एअरलाईन्सच्या फ्रँकफर्ट-दिल्ली विमानाला विलंब झाल्याचा आरोप झाल्यानंतर पंजाबमधील राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, विमानातील काही बदलांमुळे उड्डाणाला उशीर झाल्याचे जर्मनीच्या एअरलाईन्सने स्पष्ट केले आहे. भगवंत मान प्रवासादरम्यान दारु प्यायले असल्याने त्यांना विमानातून उतरवण्यात आल्याचा दावा शिरोमणी अकाली दल आणि पंजाब काँग्रेसने केला आहे. “लुफ्तांसा एअरलाईन्सच्या विमानात भगवंत मान दारु प्यायलेले होते, असा दावा सहप्रवाशांनी केला आहे. यामुळे विमानाच्या उड्डाणाला चार तास उशीर झाला. या प्रकारामुळे मान आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील राष्ट्रीय अधिवेशनात पोहोचू शकले नाहीत,” असे ट्वीट शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंग मजिठिया यांनी केले आहे. ही घटना जगभरातील पंजाबी लोकांसाठी लाजिरवाणी असल्याचे मजिठिया म्हणाले आहेत.

पंजाब सरकारला सहा महिने पूर्ण; भ्रष्टाचारापासून ते ऑडिओ क्लीपर्यंत ‘ही’ सहा प्रकरणं राहिली वादग्रस्त

दरम्यान, आम आदमी पक्षाचे मुख्य प्रवक्ते मलविंदर सिंग कांग यांनी हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी विरोधी पक्ष नकारात्मक प्रचार करत असल्याचे कांग म्हणाले आहेत. प्रकृती ठीक नसल्याने भगवंत मान यांना परत येण्यास उशीर झाला, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ministry of civil aviation to enquire about allegations whether punjab cm bhagwant man was deplaned due to drunk rvs