तालिबानने अफगाणिस्तान आपल्या ताब्यात घेतल्यानंतर आता संपूर्ण जगाचं लक्ष अफगाणिस्तानच्या परिस्थितीकडे लागलं आहे. भारतासह इतरही अनेक देश आपापल्या देशातील नागरिकांना तिथून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहे. परराष्ट्र मंत्रालयाने अफगाणिस्तानमधल्या भारतीय राजदूतांना तात्काळ बाहेर भारतात परत आणण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे.
भारतीय वायूसेनेचं C-17 हे विमान आज काबूलहून भारताकडे रवाना झालं आहे. भारताचं हे विमान अमेरिकी सैनिकांच्या संरक्षणात बाहेर काढण्यात आलं. या विमानात जवळपास १४० भारतीय आहेत. यात भारतीय राजदूत आर. टंडन यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांना काबूलमधून परत भारतात आणण्यात येत आहे. त्याचबरोबर तिथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांनाही लवकरात लवकर भारतात परत आणण्यात येत आहे.
In view of the prevailing circumstances, it has been decided that our Ambassador in Kabul and his Indian staff will move to India immediately: MEA Spokesperson Arindam Bagchi
(file photo) pic.twitter.com/QFXWeRxbwB
— ANI (@ANI) August 17, 2021
काबूलमध्ये जवळपास ५०० भारतीय अडकले आहेत. भारत सरकारच्या C-19 या विमानाच्या साहाय्याने लोकांना बाहेर काढलं जात आहे. सोमवारी साधारण ४६ भारतीय देशात परतले. तर बाकीच्यांना आज बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आजतकने याबद्दल दिलेल्या माहितीनुसार, ५०० च्या आसपास अधिकारी तर भारताचे ३०० ते ४०० सुरक्षा जवान सध्या अफगाणिस्तानमध्ये आहेत.
हेही वाचा – अफगाणिस्तानातील बहुतांश देशांचे दूतावास रिकामे
तालिबानी दहशतवाद्यांनी युद्धग्रस्त देश ताब्यात घेतला आहे. तालिबानी दहशतवादी रविवारी काबूलमध्ये घुसले व त्यानंतर घनी यांचे सरकार कोसळले. त्यामुळे घनी यांच्यासह नागरिक व परदेशी व्यक्ती यांना देश सोडावा लागला. त्यामुळे अफगाणिस्तानातील बहुतांश दूतावास रिकामे करण्यात आले असून तेथील नागरिक आणि कर्मचाऱ्यांना परत नेण्यासाठी अनेक देशांनी काबूल विमानतळावर विमाने पाठवली आहेत. सौदी अरेबियाने त्यांचे सर्व दूतावास कर्मचारी माघारी नेले असून न्यूझीलंडने त्यांचे कर्मचारी व काही नागरिक यांना माघारी आणण्यासाठी विमान पाठवले आहे. सौदी अरेबियाने म्हटले आहे की, काबूल येथील दूतावासातून रविवारी सर्व कर्मचाऱ्यांना माघारी आणण्यात आले आहे. इतर देशांनीही काबूलचा ताबा तालिबानने घेतल्यामुळे त्यांचे कर्मचारी माघारी नेले आहे.