वृत्तसंस्था, नवी दिल्ली/ढाका

बांगलादेशामध्ये दुर्गोत्सवादरम्यान पूजा मंडपावर झालेला हल्ला तसेच काली मंदिरात झालेली मुकुट चोरी यांची गंभीर दखल घेण्यात आल्याचे भारताच्या परराष्ट्र विभागाने शनिवारी स्पष्ट केले. बांगलादेशातील हिंदू, सर्व अल्पसंख्याक आणि त्यांची प्रार्थनास्थळे यांची सुरक्षा आणि सुरक्षितता यांची काळजी घ्यावी अशी विनंती भारत सरकारतर्फे करण्यात आली.

बांगलादेशात हिंदूंच्या प्रार्थनास्थळी होणाऱ्या हल्ल्यांचे वर्णन परराष्ट्र मंत्रालयाकडून खेदजनक असे करण्यात आले आहे. बांगलादेशातील मंदिरे आणि देवतांचे पद्धतशीर पावित्र्यभंग केले जात आहे अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ‘‘ढाक्याच्या तांतीबाजार येथील पूजा मंडपावरील हल्ला आणि सातखीरा येथील जोगेश्वरी काली मंदिरातील चोरी यांची आम्ही गांभीर्याने दखल घेतली आहे,’’ असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जुन्या ढाक्याच्या तांतीबाजार भागातील दुर्गापूजा मंडपात शुक्रवारी रात्री गावठी बॉम्ब फेकण्यात आल्याचे वृत्त बांगलादेशातील ‘प्रोथोम आलो’ या वर्तमानपत्राने दिले आहे. या बॉम्बचा स्फोट झाला पण त्यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. या घटनांची भारताने गंभीर दखल घेतल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा : GN Saibaba Passed Away : दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा यांचे निधन; रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

दरम्यान, दुर्गापूजा सोहळ्यादरम्यान जवळपास ३५ अनुचित प्रसंग घडले असून त्या प्रकरणी १७ जणांना अटक करण्यात आली आहे आणि १०पेक्षा अधिक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत अशी माहिती ढाक्याचे पोलीस महानिरीक्षक मोहम्मद मोइनुल इस्लाम यांनी ‘ढाका ट्रिब्युन’ या वर्तमानपत्राला दिली आहे. पूजा मंडपांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमुळे चिंता आणि भीती आहे, अन्यथा हा सोहळा अधिक उत्साहात साजरा झाला असता असे तेथील हिंदू नागरिकांनी सांगितले. बांगलादेशात जवळपास आठ टक्के हिंदू असून त्यांची लोकंख्या जवळपास एक कोटी ३० लाख इतकी आहे. विद्यार्थी निदर्शनांनंतर शेख हसीना सत्तेवरून पायउतार होऊन भारताच्या आश्रयाला आल्या आहेत. त्यानंतर तेथे हिंदूंवर हल्ल्यांच्या काही घटना घडल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या दुर्गापूजा उत्सवावर चिंता आणि भीतीचे सावट दिसून आले.

हेही वाचा : Mehsana Wall Collapses : गुजरातमध्ये भिंत कोसळून ७ मजूरांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भिती

युनुस यांची ढाकेश्वरी मंदिराला भेट

पूजा मंडपावरील हल्ला, मंदिरातील चोरी या घटनांच्या पार्श्वभूमीवर हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनुस यांनी ढाक्यातील अनेक शतके जुन्या ढाकेश्वरी मंदिराला भेट दिली. आम्हाला असा बांगलादेश उभारायचा आहे जिथे प्रत्येक नागरिकाच्या अधिकाराचे रक्षण केले जाईल असे ते मंदिरातील कार्यक्रमात म्हणाले.