जम्मूमधील भारतीय हवाई दलाच्या तळावर ड्रोनच्या सहाय्याने करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. हल्ल्यासंबंधी प्राथमिक अहवाल मंत्रालयाकडे सोपवण्यात आल्यानंतर हा तपास एनआयकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिकृतपणे तपास सुरु करण्यासाठी एनआयकडून गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी दोन ड्रोनची घुसखोरी

ड्रोनच्या सहाय्याने हवाई दलाच्या तळावर करण्यात आलेल्या या हल्ल्यामागे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना असल्याचा संशय आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर केंद्रीय गृहमंत्रालयाचं लक्ष आहे.

काय झालं होतं –

दहशतवाद्यांनी ड्रोन विमानातून स्फोटके पाठवून रविवारी भारतीय हवाई दल केंद्रावर हल्ला केला होता, त्यात दोन बॉम्बचा समावेश होता. त्यात दोन अधिकारी जखमी झाले होते. ड्रोन्सच्या मदतीने जम्मूत करण्यात आलेला हा पहिलाच हल्ला होता.

दहशतवाद्यांचा ड्रोनहल्ला

सोमवारी आणखी दोन ड्रोनची घुसखोरी

रातनुचाक—कालुचाक लष्करी भागात सोमवारी दोन ड्रोन्सवर लष्कराच्या जवानांनी सतर्कता दाखवत गोळीबार केला. रविवारी रात्री ११.४५ वाजता पुन्हा एक ड्रोन विमान हद्द ओलांडून आले होते. त्यानंतर दुसरे ड्रोन पहाटे २.४० वाजता आले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तेथे उपस्थित सैनिकांनी गोळीबार करताच ही दोन्ही ड्रोन विमाने माघारी गेली.

अधिकाऱ्यांनी सांगितले,की जलद प्रतिसाद दलास सतर्कतेचे आदेश देऊन परदेशी ड्रोन्सवर गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जम्मूतील लष्कराचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल देवेंदर आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारच्या हल्लय़ानंतर या भागात सतर्कता बाळगण्यात येत आहे. या हल्लय़ानंतर पुन्हा दोन ड्रोन विमाने आली होती, त्यांच्यावर गोळीबार करताच ती माघारी गेली. यातून मोठा धोका टळला आहे. आमच्या जवानांनी सतर्कता दाखवून या ड्रोन विमानांना पिटाळून लावले. सुरक्षा दले सतर्क असून हे ड्रोन खाली पाडण्यासाठी गोळीबार करण्यात आला.

दरम्यान लष्करी केंद्राच्या सभोवताली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून कसून शोधमोहीम चालू आहे. आतापर्यंत तरी जमिनीवर काही आक्षेपार्ह आढळून आलेले नाही.