सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहिल्याने पंजाबचा दौरा अर्धवट सोडण्याची वेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आली आहे. पंजाबमधील भटिंडा विमानतळावर उतरल्यावर हेलिकॉप्टरने पंतप्रधान मोदी हे हुसैनीवाला इथे राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्यासाठी जाणार होते. मात्र खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर ऐवजी रस्त्याने जाण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी दोन तास प्रवास करावा लागणार होता. स्मारकापासून ३० किलोमीटरवर असतांना काही आंदोलनकर्त्यांनी रस्ता अडवल्याने पंतप्रधान यांच्या वाहनांचा ताफा थांबवावा लागला. यामुळे पंतप्रधान यांना तिथल्या उड्डाणपूलावर १५ ते २० मिनिटे अडकून राहावे लागले. सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी आढळल्याने पंतप्रधान मोदी यांना हा दौरा अर्धवट सोडून परतावे लागले.
पंतप्रधान यांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहिल्याबद्द्ल केंद्रीय गृह विभागाने नाराजी व्यक्त करत पंजाब सरकारला यावर उत्तर द्यायला सांगितले आहे. पंतप्रधान यांचा दौरा हा आधी ठरला होता आणि दौऱ्याबाबत – प्रवासाबाबतची माहिती ही आगाऊ दिली होती. यानुसार आवश्यक तयारी, सुरक्षेची व्यवस्था, लॉजिस्टिक व्यवस्था, आकस्मित योजना यांची तयारी करणे आवश्यक होते. आकस्मित योजनेनुसार रस्त्याने प्रवास करतांना आवश्यक सुरक्षा व्यवस्था तैनात करणे अपेक्षित होते. मात्र हे झालं नाही, सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी आढळून आली, या शब्दात केंद्रीय गृह विभागाने नाराजी व्यक्त केली आहे.
या सर्व प्रकाराबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश केंद्रीय गृह विभागाने पंजाब सरकारला दिले आहे. एवढंच नाही तर या सर्व प्रकाराला नेमका कोण जबावदार आहे हे निश्चित करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तेव्हा आता पंजाब सरकार काय अहवाल सादर करते, सुरक्षेच्या त्रुटीबाबत काय माहिती देते हे बघणे महत्त्वाचे ठरेल.