पेट्रोलियम मंत्रालयातील हेरगिरी प्रकरणात अटक केलेल्या तेरा जणांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी आज आरोपपत्र सादर केले. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने महानगर दंडाधिकारी आकाश जैन यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून २० एप्रिलपर्यंत त्याचा विचार करून आरोपनिश्चिती केली जाईल. चौकशी पूर्ण झालेली नसल्याने या प्रकरणी कार्यालयीन गोपनीयता कायद्यातील कलमे लावण्यात आलेली नाहीत पण ती लावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महानगर दंडाधिकारी संजय खनगवाल हे आज रजेवर असून ते या ४४ पानी आरोपपत्राची निश्चिती करणार आहेत. पोलिसांनी या प्रकरणात ४२ साक्षीदारांची नावे दिली आहेत. पोलिस सूत्रांनी सांगितले की, कार्यालयीन गोपनीयता कायद्याचे उल्लंघन केल्याचे कलम आरोपींवर लावण्यात आलेले नाही कारण अजून चौकशी सुरू आहे. १५ एप्रिल रोजी पेट्रोलियम व भूगर्भवायू मंत्रालयाच्या अहवालात असे म्हटले आहे की, या आरोपींकडून जप्त केलेली आठ कागदपत्रे वर्गीकृत होती व त्यांच्याकडून जप्त केलेली कोणतीच कागदपत्रे ही सार्वजनिक स्वरूपात जाहीर करण्यातील नव्हती.
१३ आरोपींमध्ये पाच कंपनी अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे शैलेश सक्सेना, इस्सारचे विनय कुमार, केर्न्स इंडियाचे के.के.नाईक, ज्युबिलंट एनर्जीचे सुभाष चंद्र व रिलायन्स अनिल अंबानी गटाचे ऋषी आनंद यांचा समावेश आहे. इतर आठ आरोपीत ईश्वर सिंह, आशापम, राजकुमार चौबे, लालता प्रसाद, राकेशकुमार, वीरेंद्रकुमार, प्रयास जैन व पत्रकार शंतनु सैकिया यांचा समावेश आहे. सर्व आरोपी सध्या तुरूंगात आहेत.
१० एप्रिलला न्यायालयाने गृह मंत्रालय व पेट्रोलियम मंत्रालयाकडून अहवाल मागवला होता. त्यात कोणत्या प्रकारची न्यायालयाने जप्त केली आहेत याची विचारणा त्यात केली होती. २० फेब्रुवारीला पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना वर्गीकृत कागदपत्रे लालताप्रसाद व राकेश यांच्याकडून खरेदी केल्याच्या प्रकरणी अटक केली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा