Howrah Hospital Molestation Case : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणी देशातील वातावरण शांत झालेलं नसताना पश्चिम बंगालमधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हावडा येथील एका रुग्णालयातील कर्मचाऱ्याने रुग्णालयात दाखल असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे. सीटीस्कॅन केंद्रात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत त्याने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अल्पवयीन मुलीच्या पालकांनी गुन्हा दाखल केला आहे. टाईम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
ही घटना रुग्णालयाच्या खोलीत घडल्याचे सांगण्यात आले आहे. रुग्णालय प्रशासनाने या घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे आणि सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. भाजपा पश्चिम बंगालचे सचिव उमेश राय यांनी एएनआयला सांगितलं की, “काल रात्री हावडा येथील एका अल्पवयीन मुलीला सीटीस्कॅन करावे लागले. ती रुग्णालयात दखल होती. तिला सीटीस्कॅन केंद्रात नेले असता तेथे काम करणाऱ्या एका मुलाची नजर तिच्यावर गेली. त्याने तिच्याशी असभ्य वर्तन केल. तिला काही व्हिडिओ दाखवले. तिला तिचे कपडे काढण्यास सांगितले. तिचा विनयभंग झाला आहे. तिथे कोणीही नव्हते म्हणून हा प्रकार घडला. हा प्रकार ज्याने केला तो स्वतः आधीपासूनच गुन्हेगार आहे. या देशात रुग्ण, डॉक्टर आणि रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.”
हेही वाचा >> Sunjoy Roy : कोलकाता प्रकरणातील आरोपी संजय रॉयला हवं चाओमिन, तुरुंगातली पोळी-भाजी पाहून संताप, म्हणाला..
पीडितेला न्याय देणार
या प्रकरणामुळे स्थानिक रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून कडक उपाययोजनाही सुरू करण्याची मागणी होत आहे. अधिकाऱ्यांनी जनतेला आश्वासन दिले आहे की ते हे प्रकरण गांभीर्याने घेणार असून पीडितेला न्याय मिळवून देणार आहेत.
कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणातील अपडेट काय?
कोलकाता येथील आर. जी. कर महाविद्यालय आणि रुग्णालयात ९ ऑगस्टला एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेने सगळा देश हादरला. या प्रकरणातला आरोपी संजय रॉय याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं आहे. संजय रॉयने ( Sunjoy Roy ) तुरुंगात मिळणाऱ्या जेवणावर संताप व्यक्त केला आहे. पोळी भाजी नाही तर चाओमिन आणि अंडी खायला हवीत असं त्याने म्हटलं आहे.