गेमिंग लॅपटॉप विकत घेण्यासाठी मित्रांनीच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आधी या सगळ्यांनी आपल्या आठवीत शिकणाऱ्या मित्राचं अपहरण केलं. या मित्राचे आई वडील खंडणीसाठी मागितलेले तीन लाख रुपये देऊ शकले नाहीत. त्यामुळे मित्रांनीच त्यांच्या मित्राला गळा आवळून ठार केलं. त्याआधी त्याची रसगुल्ला खाण्याची शेवटची इच्छाही पूर्ण केली. ही घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे.
मित्रांना भेटायला गेलेला मुलगा परतलाच नाही
या घटनेत ज्या मुलाचा मृत्यू झाला त्याच्या आई वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार मित्रांना भेटायला जातो असं सांगून मुलगा घराबाहेर पडला होता. मात्र तो घरी परतलाच नाही. पश्चिम बंगालच्या नादिया या जिल्ह्यात आठवीमध्ये शिकणारा हा मुलगा आपल्या मित्रांना भेटण्यासाठी सायकल घेऊन निघाला होता. मात्र तो परत आलाच नाही. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो कुठेही सापडला नाही त्यामुळे या मुलाच्या घरातल्यांनी कृष्णानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
हे पण वाचा- नाशिकमध्ये मित्रांकडून युवकाची हत्या, अपघाताचा बनाव करणारे दोन संशयित ताब्यात
पोलिसांनी काय सांगितलं?
पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला. त्यावेळी सुरुवातीला पोलिसांना वाटलं की हा मुलगा हरवला आहे. मात्र त्याच्या बरोबर शाळेत शिकणाऱ्या त्याच्या मुलाला पोलिसांनी अटक केली तेव्हा सगळं सत्य समोर आलं. या प्रकरणी पोलीस आणखी तिघांचा शोध घेत होते. ज्या सगळ्यांना नंतर अटक करण्यात आली. या सगळ्या मित्रांनी गेमिंग लॅपटॉप खरेदी करण्यासाठी आपल्या मित्राचं अपहरण केलं आणि या मित्राच्या आई वडिलांकडे तीन लाखांची खंडणी मागितली होती अशी माहिती पोलिसांनी दिली. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
हे पण वाचा –धक्कादायक! प्रेमात अडथळा ठरणाऱ्या चार वर्षांच्या चिमुरड्याला आई आणि तिच्या प्रियकराने संपवलं
रसगुल्ला खाऊ घालून केली हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या चार जणांनी ज्या मित्राचं अपहरण केलं होतं त्याच्या आई वडिलांकडे तीन लाख रुपयांची खंडणी मागितली. मात्र या मुलाचे आई वडील ही रक्कम देऊ शकले नाहीत म्हणून गळा दाबून मित्रांनीच मित्राला संपवलं. समोर आलेल्या एका माहितीनुसार या मित्राला मारण्यापूर्वी त्याची शेवटची इच्छा विचारण्यात आली होती. या मुलाने मृत्यूपूर्वी हे सांगितलं की त्याला रसगुल्ला खायचा आहे आणि कोल्ड ड्रिंक प्यायचं आहे. त्यानुसार त्याची शेवटची इच्छा पूर्ण कऱण्यात आली त्यानंतर त्याची गळा दाबून हत्या करण्यात आली. या सगळ्यांनी या मुलाचा मृतदेह एका पिशवीत भरला आणि ती पिशवी एका निर्जन तलावात फेकली. पोलिसांनी शोध घेऊन हा मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी या प्रकरणात एकूण तीन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. तसंच या प्रकरणी पुढील तपास सुरु केला आहे.