आजकाल कोणत्या कारणावरून कोणाची हत्या होईल हे सांगता येत नाही. १०-२० रुपयांसाठी हत्या झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. नुकतीच नवी मुंबईत अभ्यासासाठी आई रागवल्याने एका अल्पवयीन मुलीने बेल्टने गळा आवळून खून केल्याची घटना घडली होती. त्यानंतर त्या हत्येला आत्महत्या दाखवण्यासाठी तिने बनाव रचना होता. दरम्यान, बुधवारी दिल्लीत झालेल्या एका हत्यने खळबळ उडाली आहे. चार वर्षाच्या मुलानं घरासमोर लघूशंका केल्यानं त्याच्या आईची हत्या झाली. मृत महिलेच्या चार वर्षीय मुलानं आरोपी मुलाच्या घरासमोर लघूशंका केल्यामुळे चिडलेल्या मुलाने महिलेची ब्लेडने गळा चिरून हत्या केली. ही धक्कादायक घटना दिल्लीच्या अमन विहार भागात बुधवारी रात्री उशिरा घडली. सविता राणा उर्फ प्रिया (३३) असे मृत महिलेचे नाव आहे.
बुधवारी रात्री साडेअकरा वाजता पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. याप्रकरणी अमन विहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास करण्यात आला. तपासादरम्यान, एका अल्पवयीन मुलाला पकडण्यात आले. आरोपी आणि मृत दोघेही एकाच परिसरात राहतात. मृत सविता यांच्या चार वर्षांच्या मुलाने आरोपीच्या घरासमोर लघूशंका केल्यावर त्यांच्यात वाद झाला होता. यावेळी काही दुकानदारांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास हा अल्पवयीन मुलगा सविताच्या दुकानात पुन्हा तिच्याशी बोलण्यासाठी गेला. पण प्रकरण मिटण्याऐवजी वाढले आणि आरोपी मुलाने ब्लेडने गळा चिरून तिची हत्या केली आणि पळून गेला. आम्हाला प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर तपासाअखेरीस त्या अल्पवयीन मुलाला अटक केली आहे, असे रोहिणीचे पोलीस उपायुक्त प्रणव तायल यांनी सांगितले.