इन्स्टाग्रामवरील लाइक्स आणि कमेंटवरुन झालेल्या वादातून दुहेरी हत्याकांड झाल्याने राजधानी दिल्ली हादरली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका मुलीने आपल्या अल्पवयीन भावासोबत मिळून ही हत्या केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलीसहित चार आरोपींना ताब्यात घेतंल आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेली शस्त्रंही पोलिसांनी जप्त केली आहेत. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
पीडित तरुण साहिल आणि त्याचा मित्र विजयादशमीच्या कार्यक्रमातून परतत असताना त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात राहणाऱ्या एका मुलीसोबत साहिलचा इन्स्टाग्रामवरील लाईक्स आणि फॉलोअर्सवरुन वाद सुरु होता. यावरुनच तरुणीने साहिलला आपल्या घरासमोरील गल्लीत येण्याचं आव्हान दिलं होतं.
साहिल आपला मित्र निखिलसोबत तरुणीला भेटण्यासाठी पोहोचला होता. पण त्याचवेळी तिचा अल्पवयीन भाऊ आणि इतरांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. यानंतर दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तिथे उपस्थित लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांना धमकावलं आणि फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. दोघांना जखमी अवस्थेत जवळच्या बाबू जगजीवन राम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.