दिल्लीमध्ये ११ वर्षांच्या अल्पवयीन शाळकरी मुलीवर दोन विद्यार्थ्यांनीच वॉशरुममध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केंद्रीय विद्यालयात ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी दिल्ली महिला आयोगाने पोलिसांना नोटीस पाठवली असून सविस्तर अहवाल मागवला आहे.
दिल्ली महिला आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात ही घटना घडली आहे. शाळेतल्या शिक्षकांनी ही घटना लपवण्याचा प्रयत्न केल्याचा पीडित मुलीचा आरोप आहे. दरम्यान, केंद्रीय विद्यालय संघटनेच्या स्थानिक कार्यालयानेही याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा – अपहरण झालेल्या शीख कुटुंबाची अमेरिकेत हत्या
घटना जुलै महिन्यात घडलेली असून, मंगळवारी मुलीने पोलिसांकडे तक्रार केली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.
मुलीला वॉशरुममध्ये बंद करुन सामूहिक बलात्कार
आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, “जुलै महिन्यात पीडित मुलगी आपल्या वर्गात जात असताना ११ वी आणि १२ वीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना तिचा धक्का लागला. मुलीने त्या मुलांची माफी मागितली, पण त्यांनी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. यानंतर ते तिला घेऊन शौचालयात गेले. यानंतर त्यांनी दरवाजाची कडी लावली आणि बलात्कार केला. जेव्हा तिने आपल्या वर्गशिक्षिकेला याबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकलं आहे सांगत प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न केला”.
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मलिवाल यांनी याप्रक्ररणी कठोर कारवाईची मागणी केली असून, शाळा प्रशासनाची नेमकी काय भूमिका होती याचाही तपास केला पाहिजे असं म्हटलं आहे. “शाळेमध्ये ११ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं गंभीर प्रकरण आमच्याकडे आलं आहे. वर्गशिक्षिकेने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचाही मुलीचा आरोप आहे. शाळेमध्येही मुलं सुरक्षित नाहीत ही बाब फारच दुर्देवी आहे”, असं त्यांनी म्हटलं आहे.
महिला आयोगाने पोलिसांकडे याप्रकरणी अहवाल मागितला आहे. एफआयआर आणि आतापर्यंत करण्यात आलेल्या अटक यांची माहिती द्यावी असं त्यांनी सांगितलं आहे. याशिवाय हे प्रकरण लपवणाऱ्या शाळेच्या शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करण्यात आली आहे याबद्दलही विचारणा केली आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, पोलीस तपाासानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांना य़ा घटनेची माहिती मिळाली असा केंद्रीय विद्यालयाचा दावा आहे. पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत आहेत.