मोटारचालकाच्या बेदरकारपणामुळे अपघातात डोळा गमवावा लागलेल्या मुलाला नुकसानभरपाईपोटी सुमारे ७.७१ लाख रुपये देण्याचे आदेश येथील मोटर अपघात भरपाई लवादाने मंगळवारी एका प्रकरणात दिले.
मोटर अपघात भरपाई लवादाने (मॅक्ट) अपघात करणाऱ्या होंडा सिटी गाडीचा विमा ज्या कंपनीकडे उतरवण्यात आला होता, त्या इफ्को-टोकियो इन्शुरन्स कंपनी लिमिटेडला उत्तर नगर येथील रहिवासी असलेल्या पीयूष जैन या अपघातात डोळा गमवावा लागलेल्या मुलाला ही रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत. पीयूषने आपल्या वडिलांमार्फत यासंबंधात याचिका दाखल केली होती.
पोलिसांनी याप्रकरणी तपासाअंती बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्या मोटारचालकास दोषी ठरवले आहे, असे ‘मॅक्ट’चे अधिकारी अरुण भारद्वाज यांनी सांगितले.
ऑक्टोबर, २०१० मध्ये मी आणि माझा मुलगा स्कूटरवरून जात असताना उत्तमनगर येथील रमा प्रॉपर्टीजवळ होंडा कारचे मालक दीपक गुप्ता यांनी मागून वेगात येताना स्कूटरला जोराची धडक दिली. त्यामुळे मी आणि माझा दोन वर्षांचा मुलगा दोघेही खाली पडून जखमी झालो, असे चौकशीत सांगितले होते.
या अपघातामुळे तेव्हा दोन वर्षांच्या असलेल्या पीयूषच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याचा डावा डोळा शस्त्रक्रिया करून काढावा लागला व त्याजागी दुसरा कृत्रिम डोळा बसवावा लागला. हा कृत्रिम डोळाही त्याच्या वाढीनुसार बदलावा लागणार आहे.

Story img Loader