नीट परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने एका विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणीने सुसाईट नोट लिहिली होती. यामध्ये तिने आपण फक्त आनंदी असल्याचा आव आणत होतो असं म्हटलं आहे. तसंच आपल्या पालकांकडे माफी मागितली आहे. तामिळनाडूमधील निलगिरीस येथे ही घटना घडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१७ वर्षीय विद्यार्थिनीने नुकतंच आपलं १२ वीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर सप्टेंबर महिन्यात नीट परीक्षा दिली होती. वैद्यकीय पात्रता चाचणीत आपण अनुत्तीर्ण झाल्याचं समजल्यानंतर ती प्रचंड तणावात गेली होती. मुलगी खूप तणावात असल्याने कुटुंबाने तिला तिरुपूर येथील नातेवाईकांकडे पाठवलं होतं. दिवाळीदरम्यान ती पुन्हा आपल्या घऱी आली होती.

१८ डिसेंबरला शनिवारी मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी तिने सुसाईड नोट लिहून आपल्या आत्महत्येचं कारण सांगण्याचा प्रयत्न केला. खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना २३ डिसेंबरला तिचं निधन झालं.

सुसाईड नोटमध्ये तिने लिहिलं होतं की, “नीट परीक्षेत नापास झाल्याच्या तणावातून मी बाहेर येऊ शकले नाही. मी आनंदी असल्याचा आव आता आणू शकत नाही”.

तामिळनाडूतील आत्महत्या

याआधी ७ नोव्हेंबरला एका रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराच्या मुलीने नीट परीक्षेत दोनदा नापास झाल्यानंतर आत्महत्या केली होती. त्याच्या एक महिना आधी २० वर्षीय तरुणानेही याच कारणामुळे आयुष्य संपवलं होतं.

यावर्षी सप्टेंबरमध्ये तामिळनाडू विधानसभेने NEET संबंधी एक विधेयक मंजूर केले. या विधेयकानुसार, राज्यातील इच्छुकांना १२ वीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minor girl from tamil nadu suicide after failing neet exams says was pretending to be happy in note sgy