Crime News : तेलंगणामध्ये एका धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे आपल्या कुटुंबासह प्रवास करत असलेल्या अल्पवयीन मुलीवर ट्रेनच्या वॉशरुममध्ये बलात्कार आणि मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. सरकारी रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) यांनी शुक्रवारी याबद्दल माहिती दिली.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना ३ एप्रिल रोजी सकाळी घडली. ज्यामध्ये एका विशीतील आरोपीने मुलीवर गंभीर लैंगिक अत्याचार आणि बलात्कार केला. ही घटना घडली तेव्हा पीडित मुलगी ही तिच्या कुटुंबियांबरोबर प्रवास करत होती. प्रवासादरम्यान आरोपी मुलीचा पाठलाग करत वॉशरूममध्ये गेला आणि आत तिच्यावर अत्याचार केला.
या प्रकरणी तेलंगणाच्या सिकंदराबाद येथील रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे का? असे विचारले असता, जीआरपीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सध्या त्याची चौकशी सुरू आहे, अशी माहिती दिली.
यापूर्वीही रेल्वेत अत्याचाराचा प्रयत्न
यापूर्वी २२ मार्च रोजी बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या एका पुरूषापासून वाचण्यासाठी २३ वर्षीय महिलेने चालत्या रेल्वेगाडीतून बाहेर उडी घेतली होती. या घटनेत या महिलेला गंभीर दुखापत झाली होती. ही घटना घडली तेव्हा पीडित महिला सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरून मेडचल येथे जाणाऱ्या एमएमटीएस (मल्टी-मॉडल ट्रान्सपोर्ट सिस्टम) रेल्वेच्या महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यात एकटीच प्रवास करत होती. त्यानंतर पुन्हा एकदा रेल्वेत अत्याचाराची घटना घडल्याने रेल्वे प्रवासादरम्यान महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. दरम्यान या प्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार झालेल्या आरोपीला पकडण्यासाठी शोध घेतला जात आहे.
“वयाच्या विशीत असेल्या एका मुलीवर एका व्यक्तीने रेल्वेत हल्ला केला. स्वत:ला वाचवण्यासाठी तिने चालत्या ट्रेनमधून उडी घेतली. तिला दुखापत झाली असून तिच्यावर गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी एक गुन्हा दाखल केला असून चार विशेष पथके आरोपीला पकडण्यासाठी रवाना करण्यात आली आहेत,” अशी माहिती हैदराबाद नॉर्थ झोनच्या पोलीस अधीक्षक चंदना दीप्ती यांनी पीटीआयला सांगितले