Chandigarh : मागील काही दिवसांपासून देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी कोलकत्ता येथे डॉक्टर तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घटली होती. त्यानंतर महाष्ट्रातील बदलापूर येथेही दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचं प्रकरण पुढं आलं होतं. त्यानंतर आता चंदीगडमध्येही १२वी शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेच्या बस चालकाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मोहम्मद रज्जाक असं या आरोपीचं नाव असून त्याला चंदीगड पोलिसांनी अटक केली आहे.

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी मागील काही दिवसांपासून मॉर्फ केलाला फोटो दाखवून तिला बॅकमेल करण्याचा प्रयत्न करत होता. तसेच त्याने तीन वेळा तिच्या घरी जाऊन तिच्यावर बलात्कारही केला. अखेर घाबरलेल्या तरुणीने पालकांना यासंपूर्ण प्रकराची माहिती दिली. त्यानंतर पालकांनी आरोपीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. तसेच त्याच्या विरोधात बलात्कार तसेच पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.

हेही वाचा – “कोलकाता पीडितेची ओळख जाहीर केलीत तर..”, सर्वोच्च न्यायालयाने दिला कारवाईचा इशारा, शिक्षेची तरतूद नेमकी काय?

पीडित विद्यार्थीनीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गेल्या काही महिन्यांपासून तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत होता. यादरम्यान त्याने तिचा फोटो मॉर्फ करून तिला धमकवण्याचाही प्रयत्न केला. जर माझ्याशी मैत्री केली नाही, तर हा फोटो सार्वजनिक करेन, अशी धमकी त्याने पीडित विद्यार्थिनीला दिली. तसेच तिला संबंध ठेवण्यास भाग पाडले.

आरोपीने सर्वप्रथम १८ मे रोजी विद्यार्थिनीचे पालक घरी नसताना जबरदस्तीने तिच्या घरात प्रवेश केला. तसेच माझ्याशी शारीरिक संबंध ठेव अन्यथा, तुझा मॉर्फ केलेला फोटो सार्वजनिक करेन, अशी धमकी त्याने विद्यार्थिनीला दिली. त्यानंतर ६ जुलै आणि २६ जुलै असे दोन वेळा पुन्हा तिच्या घरी जाऊन तिचं लैंगिक शोषण केलं.

हेही वाचा – Akola Sexual Assault: धक्कादायक! १० वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, ठार मारण्याची धमकी देऊन…

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, याप्रकरणावर चंदीगडचे शिक्षण अधिकारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही याप्रकरणाची दखल घेतली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले.