नवी दिल्ली : भाजपशासित राज्यांमध्ये अल्पसंख्याक, विशेषत: मुस्लीमधर्मीयांमधील कथित गुन्हेगारांविरोधात कारवाई करताना त्यांची घरे पाडण्याच्या घटनांविरोधात काँग्रेसने शनिवारी भूमिका घेतली. अल्पसंख्याकांना वारंवार लक्ष्य करणे अतिशय व्यथित करणारे आहे, हा प्रकार पूर्णपणे अमान्य आहे आणि तो थांबला पाहिजे, असे मत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी ‘एक्स’वरून व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यात निदर्शनांदरम्यान हिंसाचारात सहभागी झाल्याचा आरोप असलेल्या शाहजाद अली याचे घर बुलडोझरने पाडण्यात आले. त्यानंतर काँग्रेसने या मुद्द्यावर भूमिका मांडली.

हेही वाचा >>> Unified Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; नव्या पेन्शन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी!

एखाद्याचे घर पाडणे आणि त्याच्या कुटुंबाला बेघर करणे हे ‘अमानवी आणि अन्यायकारक’ आहे असे मत खरगे यांनी व्यक्त केले आहे. तर प्रियंका गांधी यांनीही ‘एक्स’वर हा मुद्दा उपस्थित केला. एखाद्यावर एखादा गुन्हा केल्याचा आरोप असेल तर केवळ न्यायालयच निर्णय घेऊ शकते. आरोपीच्या संपूर्ण कुटुंबाला शिक्षा करणे हा न्याय नाही. हा क्रौर्य आणि अन्यायाचा कळस आहे. कायदे तयार करणारे, कायद्याचे संरक्षण करणारे आणि कायदा मोडणारे यांच्यात फरक असायला हवा, असे मत प्रियंका यांनी व्यक्त केले आहे.

भाजप राज्य सरकार नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी बुलडोझरचा वापर करून राज्यघटनेचा धादांतपणे अनादर करत असल्याबद्दल काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करतो. अराजक नैसर्गिक न्यायाची जागा घेऊ शकत नाही. गुन्ह्यांची शिक्षा न्यायालयातच मिळाली पाहिजे,राज्य-पुरस्कृत दंडुकेशाहीच्या माध्यमातून नाही. मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस अध्यक्ष

आरोप केल्यावर लगेचच आरोपीच्या कुटुंबाला शिक्षा देणे, त्यांच्या डोक्यावरील छप्पर काढून घेणे, कायद्याचे पालन न करणे, न्यायालयाचा अवमान करणे आणि आरोप केल्यावर लगेचच घर पाडणे हा न्याय नाही. – प्रियंका गांधी-वढेरा, सरचिटणीस, काँग्रेस

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minorities targeted in bjp ruled states deeply troubling congress slams bulldozer action in mp zws