Godhra Train Burning: गोध्रा येथे सुमारे २३ वर्षांपूर्वी घडलेल्या साबारमती एक्सप्रेस रेल्वे हत्यकांडाच्या प्रकरणात गुजरातच्या पंचमहल जिल्ह्यातील बाल न्याय मंडळाने त्या वेळी अल्पवयीन असलेल्या तीन जणांची तीन वर्षांसाठी बालसुधारगृहात रवानगी केली आहे. या हत्याकांडात ५९ कारसेवकांची हत्या झाली होती. त्यानंतर राज्यभरात दंगली उसळल्या होत्या. बाल न्याय मंडळाचे अध्यक्ष के एस मोदी यांनी तिघांना बालसुधारगृहात तीन वर्षांची शिक्षा सुनावली असून, प्रत्येकी १०,००० रुपये दंडही ठोठावला आहे. या तीनही आरोपींचे वय आता ४० च्या आसपास आहे.

२००२ च्या गोध्रा ट्रेन हत्याकांडावेळी आरोपी किशोरवयीन होते. या प्रकरणातील इतर दोन आरोपींना बाल न्याय मंडळाने निर्दोष मुक्त केले. घटनेच्या वेळी ते देखील किशोरवयीन होते. दोषींचे वकील सलमान चरखा यांनी सांगितले की, बाल न्याय मंडळाने तिन्ही दोषींची शिक्षा ३० दिवसांसाठी स्थगित केली आहे. जेणेकरून त्यांना उच्च न्यायालयात आदेशाविरुद्ध अपील करता येऊ शकेल.

गुजरात दंगलीत १२०० हून अधिक बळी

२७ फेब्रुवारी २००२ रोजी गुजरातमधील गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेसच्या एस-६ कोचला आग लावण्यात आली होती. यामध्ये ५९ जणांचा मृत्यू झाला होता. साबरमती एक्सप्रेसला आग लावण्याच्या घटनेनंतर संपूर्ण गुजरातमध्ये खळबळ उडाली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ फेब्रुवारी २००२ पासून गुजरातच्या वेगवेगळ्या ठिकाणी जातीय दंगली पसरल्या. या दंगलींमध्ये १२०० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते.

११ दोषींना फाशीची शिक्षा

पुढे २०११ मध्ये या प्रकरणी गोध्रा येथील न्यायालयाने ३१ आरोपींना दोषी ठरवले आणि ६३ जणांना निर्दोष सोडले. कनिष्ठ न्यायालयाने ११ दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती, तर २० जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. ऑक्टोबर २०१७ मध्ये, गुजरात उच्च न्यायालयाने अनेक दोषींची शिक्षा कायम ठेवली आणि ११ जणांच्या फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत केले होते.