नवी दिल्ली : न्यायाधीश मर्यादित संसाधनांसह करीत असलेल्या कामाबाबत लोकशिक्षण करून, न्यायाधीश मंडळी सुखासीन आयुष्य जगतात ही लोकांच्या मनातील त्यांच्याबद्दलची भ्रामक समजूत दूर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांनी गुरुवारी केले.
न्यायाधीशांनी समाजापासून पूर्णपणे दूर न राहता, समाजाच्या संपर्कात राहणे महत्त्वाचे आहे, असे सर्वोच्च न्यायालय वकील संघटनेने (एससीबीए) आयोजित केलेल्या न्या. आर.एफ. नरिमन यांच्या निरोप समारंभात बोलताना न्या. रमण म्हणाले. तथापि, आम्ही न्यायाधीश बनतो, तेव्हा आमच्या समाजाशी असलेल्या संपर्कात फार मोठा बदल होतो, ही नाकारता न येणारी वस्तुस्थिती असल्याचेही ते म्हणाले. ‘न्यायाधीश म्हणून आम्ही दिवसरात्र करत असलेल्या कामाकडे मी लक्ष वेधू इच्छितो. न्यायाधीश मंडळी भल्यामोठ्या बंगल्यात राहतात, केवळ १० ते ४ या वेळेत काम करतात आणि सुट्यांचा उपभोग घेतात, अशी चुकीची समजूत लोकांच्या मनात आहे. ही समजूत खरी नाही’, असे न्या. रमण यांनी सांगितले.