भारतीय भूमीतून अपघाताने डागले गेलेले क्षेपणास्त्र थेट पाकिस्तानच्या हद्दीत १२४ किलोमीटर आतमध्ये कोसळल्याच्या घटनेबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेमध्ये निवेदन सादर केलं. संरक्षण मंत्रालयाप्रमाणेच संरक्षण मंत्र्यांनाही घडलेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे. नियमित देखभालीवेळी तांत्रिक दोषामुळे हा प्रकार घडला. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असंही राजनाथ यांनी स्पष्ट केलं आहे. भारतीय क्षेपणास्त्र ही सुरक्षित असून त्यांची विश्वासार्हता उच्च प्रतीची असल्याचंही संरक्षणमंत्र्यांनी म्हटलंय.
सदनामधील सदस्यांना संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी, “९ मार्च २०२२ रोजी घडलेल्या घटनेसंदर्भात मी सांगू इच्छितो. क्षेपणास्त्र डागताना निर्देश देताना झालेल्या चुकीमुळे ही घटना घडली. मिसाइल युनिटच्या नियमित कामकाजदरम्यान सांयकाळी सात वाजण्याच्या सुमारास चुकून एक क्षेपणास्त्र डागण्यात आलं. नंतर समोर आलेल्या माहितीनुसार हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन पडलं. ही घटना खेदजनक आहे. मात्र यामधील दिलासादायक बाब अशी की या घटनेमुळे कोणतीही नुकसान झालेलं नाही,” असं या घटनेबद्दल सांगताना म्हटलंय.
नक्की वाचा >> विश्लेषण : भारतीय क्षेपणास्त्र पाकिस्तानकडे भरकटलेच कसे? काय घडले असावे?
“सरकारने या घटनेला गंभीर्याने घेतलं आहे. यासंदर्भातील तपासाचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली याचं कारण तपासानंतरच समोर येईल. मला हे सुद्धा सांगायचं आहे की या घटनेच्या पार्श्वभूमीवर क्षेपणास्त्रसंदर्भातील ऑपरेशन्स, मेन्टेन्स आणि इन्स्ट्रक्शनच्या स्टॅण्डर्ड ऑप्रेटिंग प्रोसेसची समिक्षाही केली जात आहे,” असं संरक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
तसेच, “क्षेपणास्त्रांच्या सुरक्षेला आपण सर्वाधिक प्राधान्य देतो. यासंदर्भात कोणतीही कमतरता आढळल्यास ती तातडीने दूर केली जाईल. मी आश्वासान देऊ इच्छितो की आपली क्षेपणास्त्र यंत्रणा फार सुरक्षित आहे. आपले यासंदर्भातील प्रोटोकॉल्स उच्च स्तरावरील निर्देशांनुसार आहेत. वेळोवेळी याची समीक्षाही केली जाते. आपले सैनिक हे योग्य प्रशिक्षण दिलेले. शिस्तप्रिय आणि अशा पद्धतीचं तंत्रज्ञान हाताळण्याचा अनुभव असणारे सैनिक आपल्याकडे आहेत,” असंही राजनाथ यांनी म्हटलंय.
दरम्यान या घटनेनंतर भारताने लगेच झालेली चूक मान्य करून उच्चस्तरीय लष्करी चौकशीचे (कोर्ट ऑफ इन्क्वायरी) आदेश दिले आहेत. पण ही चौकशी संयुक्त स्वरूपाची व्हावी अशी मागणी आता पाकिस्तानने केली आहे. दोन अण्वस्त्रसज्ज देशांदरम्यान अशा प्रकारे एखाद्या क्षेपणास्त्राचे अपघाती प्रक्षेपण होऊ नये याची विशेष काळजी घेतली जाते.