नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री व जनता दलाचे (संयुक्त) सर्वेसर्वा नितीश कुमार यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पूर्वनियोजित तारखेआधी एक दिवस दिल्लीत येऊन दाखल झाले. पवार गुरुवारी दिल्लीमध्ये येणार होते, पण नितीशकुमार यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते बुधवारी राजधानीत दाखल झाले. दोन्ही नेत्यांमध्ये विरोधकांच्या ऐक्यासंदर्भात ३५ मिनिटे चर्चा झाली.

नितीश कुमार तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून अखेरच्या दिवशी बुधवारी त्यांना शरद पवार यांची भेट घ्यायची होती. केवळ नितीश कुमार यांना भेटण्यासाठी पवार बुधवारी दुपारी अडीच वाजता दिल्लीत ‘सहा जनपथ’ या निवासस्थानी आले आणि लगेचच साडेतीन वाजता त्यांनी नितीश कुमार यांची भेट घेतली. विरोधकांच्या एकजुटीसाठी नितीश कुमारांच्या प्रयत्नात मदत करण्याचे आश्वासन पवारांनी दिले. तसेच नजिकच्या काळात पाटण्याचा दौरा करणाचा मनोदयही पवारांनी व्यक्त केला.

नितीश कुमार यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली असली तरी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी परदेशात असल्याने त्यांच्याशी या दौऱ्यात चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे सोनिया मायदेशी परतल्यानंतर नितीश कुमार यांचा पुन्हा दिल्ली दौरा होणार असून ते लालूप्रसाद यादव यांच्यासह सोनियाची भेट घेणार आहेत. शिवाय हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला यांच्या सहकार्याने हरियाणामध्ये नितीश कुमार जाहीर कार्यक्रमही घेणार आहेत, अशी माहिती जनता दलाचे आमदार कपिल पाटील यांनी दिली.

विविध नेत्यांच्या भेटी

नितीश कुमार यांनी दिल्ली दौऱ्यात राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री व ‘आप’चे प्रमुख अरिवद केजरीवाल, ‘माकप’चे महासचिव सीताराम येचुरी, ‘भाकप’चे महासचिव डी. राजा, ओमप्रकाश चौताला, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव तसेच मुलायम सिंह अशा अनेक विरोधी पक्षनेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत.

Story img Loader