भाजपा आणि काँग्रेसमध्ये ‘मिशन शक्ती’च्या यशाचे श्रेय घेण्यावरून स्पर्धा लागली आहे. काँग्रसेने या अभियानाची सुरूवात यूपीए सरकारच्या काळात झाली होती असे सांगत तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचे अभिनंदन केले. तर दुसरीकडे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसचा हा दावा खोडत यूपीए सरकारने डीआरडीओला हे अभियान पुढे सुरू ठेवण्यास परवानगी दिली नव्हती, असे म्हटले. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पुन्हा ‘मिशन शक्ती’वर काम सुरू झाल्याचे ते म्हणाले.
भारताने बुधवारी ११ वाजता अँटी सॅटेलाईट मिसाइलची चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राने पृथ्वीपासून ३०० किमी उंचीवर (लो अर्थ ऑर्बिट) असलेल्या एका भारतीय उपग्रहावर यशस्वीपणे निशाणा साधला. हे संपूर्ण अभियान अवघ्या तीन मिनिटांत पूर्ण झाले. या यशामुळे भारत अमेरिका, रशिया आणि चीन या देशांच्या रांगेत जाऊन बसला आहे. हे देश अंतराळात उपग्रहाला लक्ष्य करण्याची क्षमता ठेवतात. विशेष म्हणजे भारताचे हे अभियान संपूर्णपणे स्वदेशी होते.
अंतराळातील भारताच्या या यशाची माहिती स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. हे अभियान कोणत्या देशाविरोधात नव्हे तर सुरक्षेच्या दृष्टीने तयार केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आंतरराष्ट्रीय मानक आणि नियमांचे पालन करत भारताने ही कामगिरी केली आहे. यासाठी त्यांनी भारतीय शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.
या यशाचे श्रेय घेण्यासाठी काँग्रेस समोर आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी ट्विट केले. ते म्हणाले, यूपीए सरकारच्या काळात अँटी सॅटेलाईट मिशनची सुरूवात झाली. आज हे अभियान पूर्ण झाले. यासाठी अंतराळ शास्त्रज्ञ आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या दूरदृष्टीचे अभिनंदन.
जेटली यांनी काँग्रेसचा दावा खोडला. ते म्हणाले, तत्कालीन सरकारने डीआरडीओला या अभियानासाठी परवानगी दिली नाही. २०१२ मध्ये डीआरडीओचे प्रमुख व्ही. के. सारस्वत यांनी अँटी सॅटेलाइट मिसाईल कार्यक्रम पुढे नेण्याची इच्छा व्यक्त केली. पण तत्कालीन सरकारने त्याला परवानगी दिली नाही.
२०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी अभियानाला पुढे देण्यास सहमती दर्शवली. या यशानंतर भारत अवकाशात शक्तिशाली बनला आहे. येत्या काळात परंपरागत युद्धाबरोबर सायबर आणि स्पेस युद्ध असेल.