अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची घटना समोर आली आहे. जो बायडेन यांच्या रेहोबोथ बीचजवळील घरावरून शनिवारी एक छोटं विमान नो-फ्लाय झोनमध्ये घुसलं होतं. या धक्कादायक प्रकारानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नीला सेफ हाऊसमध्ये हलवलं आहे. याबाबतची माहिती व्हाईट हाऊसकडून देण्यात आली आहे.
व्हाईट हाऊसनं सांगितलं की बायडेन आणि त्यांच्या कुटुंबाला कोणताही धोका नाही. खबरदारीच्या उपाय म्हणून त्यांना सेफ हाऊसमध्ये हलवण्यात आलं होतं. शनिवारी एका विमानानं नो फ्लाय झोनचं उल्लंघन करत जो बायडेन यांचं घर असलेल्या परिसरात घुसखोरी केली होती. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या.
“राष्ट्राध्यक्ष आणि त्यांचं कुटुंब सुरक्षित असून हा हल्ला नव्हता,” अशी माहिती व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर राष्ट्राध्यक्षांना पुन्हा त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं असल्याचंही सांगण्यात आलं आहे. या प्रकरणाची अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसने गंभीर दखल घेतली आहे.
संबंधित विमान चुकून संरक्षित हवाई हद्दीत घुसल्याची माहितीही देण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाणार असून दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. संबंधित वैमानिक हा रेडिओ सिग्नलद्वारे वापरल्या जाणाऱ्या यंत्रणेचं पालन करत होता. त्यामुळे ही चूक झाली असावी, अशी शंका उपस्थित केली जात आहे.