मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच अमेरिकेतील एमआयटी या संस्थेने मोटारींच्या निकामी बॅटरींपासून सोलर पॅनेल तयार करण्याचे तंत्र विकसित केले आहे. इतर वेळी या निकामी बॅटऱ्यांमधून शिशाचे प्रदूषण होत असते व त्यापासून बनवलेल्या सोलर पॅनेलमधून अजिबात प्रदूषण होत नाही. सोलर घट (सेल) क्षेत्रातील ही अत्यंत महत्त्वाची घटना असून, यात पेरोव्हस्काइट या संयुगाचा वापर सोलर सेल तयार करण्यासाठी केला जातो. ऑरगॅनोलीड हलाईट पेरोव्हस्काइटचा वापर यात होतो. प्राथमिक प्रयोगानंतर आता हे संयुग वापरलेले सोलर सेल स्पर्धात्मक बनत आहेत.
एमआयटी संस्थेचे ऊर्जा प्राध्यापक अँदेला एम. बेलशर व डब्ल्यू. एम. केक यांनी सांगितले, की आम्ही प्राथमिक प्रयोग केले असून त्यात सौरघटांची (सोलर सेल) कार्यक्षमता चांगली दिसून आली आहे. पेरोव्हस्काईट सेलचे ऊर्जा रूपांतरण गुणोत्तर हे १९ टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे जवळपास सिलिकॉन वापरलेल्या सौरघटाइतके आहे. सुरुवातीला पेरोव्हस्काईट तंत्रज्ञानात शिशाचा वापर केला जात असल्याने ते धोकादायक मानले जात होते, कारण कच्च्या खनिजापासून विषारी अंश शिल्लक राहात होते.
सध्या मोटारींच्या जुन्या बॅटऱ्या या टाकून दिल्या जातात. त्या पर्यावरणाला घातक ठरतात व त्यामुळे प्रदूषणही होते. यात विषारी घटकांचा वापर फोटोव्होल्टाइक पॅनेल्समध्ये केला जातो. पेरोव्हस्काईट फोटोव्होल्टाइक पदार्थ हा पातळ फिल्मचा आकार धारण करतो. ही फिल्म मायक्रोमीटर इतक्या कमी जाडीची असते. एका मोटारीच्या बॅटरीतील शिसे ३० घरांना सौरशक्तीचे दिवे पुरवू शकेल इतकी वीज निर्माण करते. पेरोव्हस्काइट सौरघट तयार करणे सोपे असते. ही प्रक्रिया कमी तापमानाला करता येते. पारंपरिक सौरघटांच्या निर्मितिप्रक्रियेपेक्षा कमी टप्पे यात असतात. बेल्चर यांच्या मते जुन्या बॅटरींमधील ९० टक्के शिसे पुनर्वापरात येऊ शकते व त्यापासून नवीन बॅटरीज बनू शकत होत्या, पण कालांतराने लेड-अॅसिड बॅटरीजची बाजारातील मागणी कमी झाली. त्यामुळे शिशाचा साठा या जुन्या बॅटरीजच्या रूपाने फिरत राहणार आहे.
यात आतला थर शिशाचा असतो व त्याला वरून वेगळय़ा पदार्थाचे आवरण दिलेले असते, त्यामुळे हे शिसे पर्यावरणात मिसळत नाही. सौरघट निकामी झाल्यानंतर हे शिसे दुसऱ्या सोलर पॅनेल्समध्ये वापरता येते.
जुन्या बॅटरीमधून मिळवलेले शिसे हे पेरोव्हस्काइट सौरघटांच्या निर्मितीसारखेच असते. यात शिसे हा धातू नव्याने तयार केला जातो. ‘जर्नल एनर्जी अँड एनव्हायर्नमेंटल सायन्स’ या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.
मोटारींच्या जुन्या बॅटरींवर सौरघट शक्य
मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच अमेरिकेतील एमआयटी या संस्थेने मोटारींच्या निकामी बॅटरींपासून सोलर पॅनेल तयार करण्याचे तंत्र विकसित केले आहे.
First published on: 20-08-2014 at 12:56 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mit researchers turn used car batteries into solar cells