MIT suspends Indian-origin PhD student : मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी)ने काही दिवसांपूर्वी भारतीय वंशाच्या पीएचडी विद्यार्थ्याला निलंबित केल्याचा प्रकार समोर आला आहे. या विद्यार्थ्याने ऑक्टोबर महिन्यात पॅलेस्टिनच्या समर्थनात एका विद्यार्थी मासिकासाठी लेख लिहिला होता. यानंतर त्या विद्यार्थ्याची एमआयटीमधून हकालपट्टी करण्यात आली. यानंतर आता विद्यापीठातील काही शिक्षकांच्या गटाने त्या विद्यार्थ्याच्या कॅम्पसमधील प्रवेशावर घालण्यात आलेली बंदी तात्काळ मागे घेण्याची मागणी करत खुले पत्र लिहिले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार प्रल्हाद अय्यंगार हा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान विभागात पीएचडीचे शिक्षण घेत होता. या विद्यार्थ्यावर कॉलेजाकडून नोव्हेंबर महिन्यापासून ते जानेवारी २०२६ पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. इतकेच नाही तर अय्यंगार याचा लेख ज्या मासिकात प्रकाशित झाला होता, त्या रिटन रिव्हॉल्यूशन (Written Revolution) मासिकावरही एमआयटीने बंदी घालण्यात आली आहे.
मीडीया रिपोर्टनुसार, अय्यंगार हा विद्यार्थी एमआयटीमध्ये पाच वर्षांच्या नॅशनल सायन्स फाऊंडेशन ग्रॅज्युएट रिसर्च फेलोशिपवरती होता. त्याचा विद्यार्थी मासिकाच्या ऑक्टोबर महिन्याच्या अंकात ‘ऑन पॅसिफिझम’ हा लेख प्रकाशित झाला. त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले. अय्यंगार यांच्यावर १ नोव्हेंबर रोजी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तसेच त्याच्या कॅम्पस प्रवेशावर बंदी घालण्यात आली.
हेही वाचा >> Sadhguru on Adani: ‘उद्योगपतींवरून संसदेत रणकंदन नको’, अदाणींना समर्थन देत सद्गुरुंनी व्यक्त केली नाराजी
अय्यंगार याचे वकिल एरिक ली यांनी त्याचे निवेदन सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केले आहे. त्याच्या निवेदनात अय्यंगार याने सांगितले की, एमआयटीच्या स्टूडंट लाइफ विभागाने एक नोव्हेंबर रोजी पाठवलेल्या बंदीसंबंधीत पत्रात, मी दहशतवादाला पाठिंबा देत असल्याचा आरोप प्रशासनाने केला आहे. कारण रिटन रिव्होल्युशनच्या ज्या अंकात माझा लेख छापून आला त्यामध्ये ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईन’च्या पोस्टर्सचा फोटो आहे. या पत्रात म्हटले आहे की, “एमआयटीशी सलग्न विद्यार्थी गटाने यूएसने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेल्या संघटनेचे चिन्ह वापरणे अत्यंत चिंताजनक आहे.” या पत्रात असेही म्हटले आहे की, माझ्या लेखात हिंसा आणि अहिंसेच्या इतिहासाबद्दल अनेक आपत्तीजनक विधाने केली आहेत, ज्यात २० व्या शतकाच्या मध्यातील वसाहत विरोधी चळवळींचा समावेश आहे. यामध्ये काही झिओनिस्ट विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या तक्रारींचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. पत्रात म्हटले आहे की, “एमआयटीली मिळालेल्या अहवालात दिसून येते की ही विधाने एमआयटीमध्ये अधिक हिंसक किंवा विध्वंसक स्वरुपाच्या आंदोलनासाठीचे आवाहन म्हणून पाहीली जाऊ शकतात.”
मासिकावरही घातली बंदी
याबरोबरच अय्यंगार याने सांगितले की एमआयटीचे स्टुडंट लाइफचे डीन डेव्हिड रँडल यांनीदेखील रिटन रिव्हॉल्युशन मासिकाच्या संपादकांना इमेल पाठवून पब्लिकेशनवर सध्या अधिकृतरित्या बंदी घालण्यात आल्याचे आणि ते सेन्सॉर केल्याचे म्हटले आहे.