Mithun Chakraborty: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपा नेते मिथुन चक्रवर्ती यांनी पश्चिम बंगालच्या हिंदू मतदारांसाठी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. राज्यात ९ टक्के हिंदू एकत्र आले तरीही रामराज्य स्थापन होईल हे कुणी विसरु नये.
गेल्या महिन्यातही असंच वक्तव्य
मिथुन चक्रवर्तींनी मागच्या महिन्यात पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा या ठिकाणीही असंच एक वक्तव्य केलं होतं. पश्चिम बंगालच्या राज्यातील लोकांना माझं इतकंच सांगणं आहे की बंगालमध्ये ९ टक्के हिंदू असे आहेत जे मतदान करत नाहीत. त्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि मतदान केलं पाहिजे. त्यांनी बाहेर यावं आणि मतदान करावं. आपण जिंकलो नाही तर हिंदू अडचणीत येतील असं मिथुन चक्रवर्ती यांनी म्हटलं होतं. आज तकने हे वृत्त दिलं आहे. उत्तर २४ परगणा या ठिकाणी मिथुन चक्रवर्ती असंही म्हटलं होतं. बांगलादेशात जे घडलं आहे त्यावरुन आपण धडा घेतला पाहिजे. आपण जर जिंकलो नाही तर पश्चिम बंगालमध्ये हिंदू बंगाली वाचणार नाहीत. भाजपा समर्थक हिंदू बंगाली सुरक्षित राहणार नाहीत. जर पुन्हा आहे तेच लोक सत्तेत आले तर ते आपल्याला सोडणार नाहीत असंही मिथुन चक्रवर्ती यांनी म्हटलं आहे.
सगळे मतभेद बाजूला ठेवा आणि भाजपाच्या उमेदवाराला निवडा-मिथुन
उत्तर २४ परगणामध्ये मिथुन चक्रवर्ती म्हणाले होते की आपण जिंकलं पाहिजे, त्याचं कारण बांगलादेशातील परिस्थिती. व्यक्तिगत विचारधारा, पसंती-नापसंती सगळं काही बाजूला ठेवा आणि भाजपाच्या उमेदवाराला निवडून द्या. आधी हे लक्षात घ्या की आपल्याला निवडणूक जिंकायची आहे. बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. हेच धोरण आपल्याकडे फायदेशीर ठरणार आहे असंही मिथुन यांनी म्हटलं आहे.
मिथुन चक्रवर्ती ममता सरकारविरोधात सातत्याने आक्रमक
भाजपा नेते आणि अभिनेते मिथुन हे ममता सरकारवर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. सर्वोच्च न्यायलायने पश्चिम बंगाल स्कूल सेवा आयोगात भरती घोटाळ्यानंतर २५ हजारांहून अधिक नियुक्त्या रद्द करण्याचा कोलकाता उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. ज्यानंतरही मिथुन यांनी तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली. या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे आणि त्यासाठी पूर्णपणे टीएमसी सरकार अर्थात ममता बॅनर्जींचं सरकार कारणीभूत आहे असं मिथुन यांनी म्हटलं आहे. मी तरुणांना आणि युवकांना हे सांगू इच्छितो की तुम्हाला तुमच्या भविष्याची चिंता असेल तर आत्ता असलेलं हे सरकार हटवा आणि भाजपाला निवडा. भाजपाच तुमचं भविष्य उज्वल करु शकते असंही मिथुन म्हणाले.