पाच वेळा सेरचिप विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले असतानाही मिझोरामचे मुख्यमंत्री लालथानहावला हे विधानसभेची निवडणूक दोन मतदारसंघांतून लढणार असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. हरांगटुझरे या मतदारसंघातूनही लालथानहावला निवडणूक का लढविणार आहेत, हे मात्र कळू शकलेले नाही.
सेरचिप मतदारसंघातून १९९८च्या निवडणुकीचा अपवाद वगळता मुख्यमंत्री १९८४ पासून पाच वेळा या मतदारसंघातून निवडून आले. त्यापूर्वी त्यांनी चंफाईमध्ये विजय मिळविला होता. मात्र १९८७ पासून ते सेरचिप मतदारसंघातूनच निवडून येत आहेत. सेरचिप मतदारसंघातून एमएनएफ च्या वतीने मुख्यमंत्र्याच्या विरोधात सी. लालरामझावुआ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. ते व्यवसायाने वकील आहेत. झोराम नॅशनलिस्ट पार्टी आणि एमपीसी या पक्षांची यंदा आघाडी झाल्याने ते मुख्यमंत्र्यांचा पराभव करू शकतील, असा मतप्रवाह आहे.