पीटीआय, ऐझवाल : Mizoram Railway Bridge Accident मिझोरममध्ये बुधवारी बांधकाम सुरू असलेल्या रेल्वे पुलाच्या अपघातानंतर २२ मृतदेह हाती लागले असून ढिगाऱ्याखाली एका बेपत्ता कर्मचाऱ्याचा शोध सुरू आहे. अपघात झाला त्यावेळी २६ कर्मचारी कामावर हजर होते. त्यापैकी तिघेजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांना प्रथमोपचार देण्यात आले तर एकाचा हात मोडला असून त्याला ऐझवाल येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे कर्मचारी पश्चिम बंगालमधील माल्दा जिल्ह्यातील आहेत.
सर्व मृतदेहांची ओळख पटली असून ते पश्चिम बंगालमध्ये नेण्यासाठी व्यवस्था केली जात असल्याचे राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना सर्व ती मदत करण्याचे आश्वासन दिले. कुरुंग नदीवर बांधल्या जात असलेल्या पूलावर गँट्री चढवली जात असताना ती कोसळून हा अपघात झाला. हा पूल भैरवी-साईरंग या नवीन रेल्वेमार्गावर बांधला जात आहे. अपघाताची चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशात ९ ठार
सहारणपूर : उत्तर प्रदेशातील सहारणपूर जिल्ह्यात रेधिबोडकी गावाजवळ एक ट्रॅक्टर ट्रॉली गटारामध्ये पडून झालेल्या अपघातामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार मुलांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बुधवारी संध्याकाळी हा ट्रॅक्टर एका धार्मिक कार्यक्रमासाठी जवळपास ५० भाविकांना घेऊन रंदौल गावाकडे निघाला होता, त्यावेळी हा अपघात झाला असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांना बुधवारी चार मृतदेह शोधण्यात यश आले तर गुरुवारी आणखी पाच मृतदेह हाती लागले.