चेन्नई : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील तरुणांची लोकसंख्या कमी होत असल्याने तरुण दाम्पत्यांना अधिकाधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केल्यानंतर दोनच दिवसांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी त्यांची री ओढली आहे.

लोकसभा मतदारसंघांच्या परिसीमनानंतर दक्षिणेकडील राज्यांच्या कमी लोकसंख्येमुळे संसदेमध्ये कमी प्रतिनिधित्व मिळेल ही भीती व्यक्त करत, ‘‘दाम्पत्यांनी १६ मुले जन्म का जन्माला घालू नयेत,’’ असा प्रश्न त्यांनी विनोदाने विचारला.

हेही वाचा >>> भारत चीनमध्ये समझोता; पूर्व लडाखमधील सीमेवर गस्तीबाबत सहमती

तामिळनाडू सरकारच्या हिंदू धार्मिक आणि धर्मादाय देणगी विभागाने (एचआरअँडसीई) चेन्नईमध्ये सोमवारी आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात ३१ जोडप्यांचा विवाह झाला. त्यावेळी काळानुसार नवदाम्पतांना देण्यात येणाऱ्या आशीर्वादात बदल झाला असल्याचा उल्लेख स्टॅलिन यांनी केला. पूर्वी तमिळनाडूत नवदाम्पत्यांना १६ निरनिराळ्या प्रकारच्या संपत्ती आणि समृद्धी मिळण्यासाठी आशीर्वाद दिला जात असे. त्याचा उल्लेख करत आणि त्याचा लोकसभा मतदारसंघांचे होणारे परिसीमन संदर्भ जोडत, जनतेने १६ मुलांचे पालनपोषण करण्याचा विचार करावा असा सल्ला दिला.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी दोनच दिवसांपूर्वी तरुण दाम्पत्यांना अधिकाधिक मुलांना जन्म देण्याचा सल्ला दिला होता. तसेच दोनपेक्षा जास्त मुले असलेल्यांनाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवता येतील असा कायदा करण्याचा विचार असल्याचेही सांगितले होते. त्यानंतर स्टॅलिन यांनी तोच विचार मांडला आहे. मात्र, त्यांनी त्याचा संबंध परिसीमनानंतर दक्षिणेकडील राज्यांना कमी लोकसंख्येमुळे संसदेत कमी प्रतिनिधित्व मिळेल याच्याशी जोडला.

एम के स्टॅलिन यांनी चेन्नईमध्ये राज्य सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक विवाहसोहळ्याला हजेरी लावली.