भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी व भाजपा आमदार रिवाबा जडेजा, भाजपा खासदार पुनम माडम आणि महापौर बीना कोठारी यांच्यात कडाक्याचं भांडण झालं आहे. या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रिवाबा जडेजा भाजपा खासदार आणि महापौरांवर रागावताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लखोटा येथे पालिकेने शहिदांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात हा वाद झाला. सुरुवातीला आमदार रिवाबा जडेजा आणि महापौर बीना कोठारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर खासदार पुनम माडम यांनी वादात हस्तक्षेप करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, रिवाबा जडेजा यांनी खासदार माडम यांनाही सुनावले. त्यामुळे हा वाद आणखी विकोपाला गेला.

“लायकीप्रमाणे राहा”

रिवाबा जडेजा यांनी खासदार माडम आणि महापौर कोठारी यांना फार हुशारी दाखवू नका असं म्हटलं. तसेच पुनम माडम यांच्यामुळेच वाद झाल्याचा आरोप केला. रिवाबा जडेजा म्हणाल्या, “हा वाद तुम्हीच सुरू केला आहे आणि आता वाद थांबवण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही सार्वजनिकपणे माझ्यासाठी ‘ओव्हर स्मार्ट (अतिहुशार)’ शब्दाचा वापर केला.” यानंतर चिडलेल्या खासदार पुनम माडम यांनी रिवाबाला लायकीप्रमाणे राहा, असं म्हटलं.

नेमकं प्रकरण काय?

क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा यांनी सांगितल्यानुसार, शहिदांना श्रद्धांजली देताना खासदार पुनम माडम यांनी चप्पल घातलेली होती. जेव्हा रिवाबा श्रद्धांजली वाहण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांनी चप्पल काढली. यानंतर खासदार माडम यांनी रिवाबा यांनी दिखाऊपणासाठी चप्पल काढल्याची शेरेबाजी केली.

“माझ्या आत्मसन्मानाचा प्रश्न असेल, तर सहन करणार नाही”

या प्रकरणानंतर रिवाबा जडेजा यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, “शहिदांच्या सन्मानासाठी मी माझ्या पायातील चप्पल काढली होती. खासदार पुनम माडम यांच्या वक्तव्याने मला राग आला. माझ्या आत्मसन्मानाचा प्रश्न असेल, तर मी अशाप्रकारची वक्तव्य ऐकून घेणार नाही.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla rivaba ravindra jadeja dispute with bjp mp mayor in jamnagar pbs
Show comments