मिझोराममध्ये २५ नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आह़े  येथील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ)ने मंगळवारी मिझोराम पीपल्स कॉन्फरन्स (एमपीसी) आणि मारालँड डेमोकट्रिक फ्रंट (एमडीएफ) या दोन पक्षांशी युतीची घोषणा केली आह़े  त्यामुळे निवडणुकीत सत्ताधारी पक्षासमोर मोठे आव्हान उभे राहणार आह़े
एमएनएफ ३१ जागा लढविणार आहे, तर ‘एमपीसी’साठी ८ आणि ‘एमडीएफ’साठी १ जागा सोडण्यात येणार आह़े  या युतीची घोषणा करताना ‘एमएनएफ’चे उपाध्यक्ष टवन्लुईया म्हणाले की, राज्यात खऱ्या अर्थाने लोकशाही शासनाची स्थापना करण्यासाठी, जनता- भूमी- धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि र्सवकष वेगवान विकास करण्यासाठी आम्ही ही युती केली आह़े  शुक्रवारी युतीची प्रचारसभा ऐझवाल येथे घेण्यात येणार असून त्या वेळी युतीचे सामायिक उमेदवार घोषित होण्याची शक्यता आह़े  

नोकऱ्यांतील वशिलेबाजी संपवण्याचे ‘एमएनएफ’चे आश्वासन
सर्व सरकारी नोकऱ्यांमधील वशिलेबाजी संपुष्टात आणण्याचे आश्वासन ‘एमएनएफ’ने मतदारांना दिले आहे. निवडणुकीत विजयी झाल्यास सर्व शासकीय पदे सेवायोजन कार्यालया-मार्फत भरण्यात येतील, असे पक्षाने स्पष्ट केले आहे. राजकीय नेते आणि शासकीय अधिकारी यांच्या शिफारशींवरून सरकारी नोकऱ्यांमध्ये भरतीचे प्रकार थांबविले जातील, असे एमएनएफने म्हटले आहे. राज्य पातळीवर लोकायुक्त, भ्रष्टाचारविरोधी प्राधिकरण स्थापन केले जाईल आणि त्यांना मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांची चौकशी करण्याचा अधिकार असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. काँग्रेसच्या विद्यमान सरकारने लादलेला वाहन कर म्हणजे वाहनधारक आणि सामान्य जनतेवर मोठा बोजा असल्याने सत्तेवर आल्यास तो रद्द करण्याचे आश्वासनही एमएनएफने दिले आहे.