मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला पक्ष आगामी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं आहे. राज ठाकरे यांनी कोणत्याही पक्षाला जाहीर पाठिंबा दिला नसला तरी भाजपा-शिवसेना युतीचा पराभव करण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उदयनराजे भोसले यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच उदयनराजे यांची भेट घेतली आणि पाठिंबा जाहीर केला. उदयनराजे भोसले यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
उदयनराजे भोसले यांनी मनसे पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीचे फोटो ट्विट करत लिहिलं आहे की, ‘सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भेटून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला. यावेळी जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष सर्व तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भेटून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष सर्व तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते. pic.twitter.com/NySo7NWkfS— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) April 3, 2019
दरम्यान राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक असतील, अशी चर्चा आहे. मात्र, त्यांचा नक्की सहभाग कशा प्रकारे असेल, ते राष्ट्रवादीच्या मंचावरुन प्रचार करणार की मनसेच्या मंचावरुनच करणार, याबाबत संदिग्धता आहे. ज्या मतदार संघात राष्ट्रवादीसमोर भाजपा- शिवसेनेचे कडवे आव्हान असेल त्या मतदार संघात राज ठाकरे यांच्या सभांचे आयोजन केले जाईल, अशी माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली आहे.
राज ठाकरे यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवार यांच्या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. तसेच राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले आहे. रंगशारदा येथे मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली होती. मोदी आणि शहामुक्त भारतासाठी भाजपाविरोधात मतदान करा, त्याचा फायदा कोणाला होतो याचा विचार करु नका, असे सूचक विधान त्यांनी केले होते. राज ठाकरे यांनी भाषणांमधून मोदी- शाह यांच्यावर बोचरी टीका केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनसेला महाआघाडीत स्थान देण्यास तयार होते. मात्र, काँग्रेसने मनसेला विरोध दर्शवला होता. त्यामुळे आता राष्ट्रवादीने मनसेशी छुपी आघाडी करण्याची भूमिका घेतल्याचे समजते. इंडियन एक्स्प्रेसला राष्ट्रवादीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या मतदारसंघात राष्ट्रवादीसमोर भाजपा – शिवसेनेचे कडवे आव्हान असेल, त्या मतदारसंघात राज ठाकरे हे सभा घेतील. आता राष्ट्रवादीची ही रणनिती यशस्वी होते का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
मनसे आणि निवडणूक
२००९ मधील लोकसभा निवडणुकीत मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या भागांमध्ये मनसेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे १२ आमदार निवडून आले होते. पण २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत मनसेची पिछेहाट झाली. या निवडणुकीत मनसेला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही मनसेला फक्त एकाच जागेवर विजय मिळाला होता. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत मनसेला १. ४७ टक्के मते मिळाली होती. तर भाजपाला २७. ५६ टक्के, शिवसेनेला २०. ८२ टक्के मते मिळाली होती. काँग्रेसला १८. २९ टक्के तर राष्ट्रवादी काँग्रेसला १६.१२ टक्के मते मिळाली होती.