महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान झाले असले तरी राजकीय पक्षांमध्ये सुरु असलेले सोशल वॉर काही थांबण्याची चिन्हे नाहीत. निवडणुका संपल्या तरी मनसेचा खोट्या आणि बनावट फोटो आणि व्हिडिओचा स्पॉन्सर्ड धंदा संपलेला दिसत नाही, अशी टीका करत भाजपाने मनसेचे समर्थन करणाऱ्या फेसबुक पेजवर गडचिरोलीतील शहीदांऐवजी ऑक्टोबर २०१७ चे अरुणाचल प्रदेशमधील फोटो वापरल्याचे ट्विट केले होते. या ट्विटवर मनसेनेही प्रत्युत्तर दिले असून पक्षाची अधिकृत भूमिका फक्त मनसे अधिकृत या ट्विटर हँडलवरच असते. खोटं पसरवण्याच्या संसर्गजन्य रोगातून भाजपा लवकर बरे होईल, हीच सदिच्छा, असे मनसेने म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फेसबुकवर मनसेचे समर्थन करणाऱ्या पेजवर एक पोस्ट करण्यात आली होती. यात गडचिरोलीतील शहीद झालेल्या जवानांचे पार्थिव खोक्यात ठेवल्याचे दिसत होते. हा प्रकार भाजपाने ट्विटरवर पोस्ट करुन छायाचित्र गडचिरोलीतील नसून २०१७ मधील अरुणाचल प्रदेशमधील असल्याचे सांगितले होते. निवडणुका संपल्या तरी मनसेचा खोट्या आणि बनावट फोटो आणि व्हिडिओचा स्पॉन्सर्ड धंदा संपलेला दिसत नाही. वस्तुतः ऑक्टोबर २०१७ चे अरुणाचल प्रदेशमधील फोटो वापरून हे फोटो गडचिरोली शहिदांचे म्हणून पसरवले जात आहेत. त्यांना याची लाज वाटली पाहिजे, असे भाजपाने म्हटले होते.

भाजपाच्या या ट्विटवर मनसेनेही ट्विटरवरुनच उत्तर दिले. मनसेने ट्विटमध्ये म्हटले आहे की, पक्षाची अधिकृत भूमिका फक्त मनसेच्या अधिकृत खात्यावर असते. कोणत्याही अनधिकृत प्रसारित माहितीचा मनसेच्या भूमिकेशी काहीही संबंध नाही. आणि हो, मुळात ज्या पक्षाने समाजमाध्यमांचा वापरच खोटं पसरविण्यासाठी केला त्यांच्याकडून आम्हाला नीतिमत्तेचे धडे नको. खोटं पसरवण्याच्या संसर्गजन्य रोगातून भाजपा लवकर बरे होईल, हीच सदिच्छा, असे मनसेने म्हटले आहे.

तुम्ही पक्षाशी कोणताही संबंध नसलेल्या अनधिकृत पेजचा दाखला दिलात आता हा घ्या भाजपाच्या अधिकृत खात्यावरून केल्या गेलेल्या खोट्या प्रचाराचा दाखला, असे म्हणत मनसेने भाजपाची देखील पोलखोल केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns bjp twitter war over fake post on social media