मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी विरोध केला आहे. उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरे यांना आयोध्यात पाऊल ठेवू देणार नाही, अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली आहे. पण आता राज ठाकरेंच्या आयोध्या दौऱ्यावरून भाजपात मतभेद असल्याचं उघड झालं आहे. अयोध्येतील भाजपा खासदार लल्लू सिंह राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहे.
खासदार लल्लू सिंह म्हणाले की, “राज ठाकरेंना श्री हनुमानाचा आशीर्वाद होता, तेव्हाच ते राम लल्ला आणि हनुमान गढीच्या दर्शनासाठी अयोध्येत येत आहेत. रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत येणाऱ्या प्रत्येकाचं आम्ही स्वागत करतो. हीच अयोध्येची परंपरा आहे.”
याबाबत अधिक विचारलं असता खासदार लल्लू सिंह म्हणाले की, खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी काय वक्तव्ये केली आहेत, याची मला माहिती नाही. त्यांची विधानं भाजपाची नसून वैयक्तिक असू शकतात. भाजपा खासदार लल्लू सिंह यांच्या विधानामुळे खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या राज ठाकरेविरोधी मोहिमेला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कैसरगंजचे भाजपा खासदार बृजभूषण हे सध्या राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याविरोधात अनेक जिल्ह्यांत जाऊन मोर्चेबांधणी करत आहेत.
मुंबईत राहणाऱ्या यूपी, बिहार आणि मध्य प्रदेशातील नागरिकांना महाराष्ट्रातून हाकलून द्या, अशी भूमिका राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे. राज ठाकरे यांनी आपल्या बऱ्यांच भाषणातून परप्रांतीयांचा मुद्दा अधोरेखित केला होता. याच पार्श्वभूमीवर भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंच्या आयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे. राज ठाकरे जोपर्यंत आपल्या वक्तव्याबद्दल उत्तर प्रदेशातील जनतेची माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांचं आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली होती. पण भाजपा खासदार लल्लू सिंह यांनी परस्पर विरोधी भूमिका घेतल्याने भाजपातील सावळागोंधळ चव्हाट्यावर आला आहे.