नरेंद्र मोदींसारखा व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर बदलू शकतो तर या जगात काहीही होऊ शकते, असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. विनोद दुआ यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेनेसोबत युती करणार का, या प्रश्नावर राज ठाकरेंनी हे उत्तर दिल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
राज ठाकरे यांनी मंगळवारी विनोद दुआ यांना यांना मुलाखत दिली असून या मुलाखतीमध्ये त्यांनी शिवसेना, नरेंद्र मोदी आदी विषयांवर भाष्य केले. प्रत्येक निवडणुकीत शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार का, अशी चर्चा रंगताना दिसते. विनोद दुआ यांनी देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले, तुर्तास आम्ही एकत्र येण्याची शक्यता दिसत नाही. पण भविष्यात काहीही होऊ शकते. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर इतकं बदलू शकतात तर भविष्यात काहीही होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
नितीन गडकरी यांना पंतप्रधानपदी बघायला आवडेल का असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. यावर राज ठाकरेंनी थेट उत्तर देणे टाळले. यंदाच्या निवडणुकीत भाजपाची सत्ता येण्याची शक्यता कमीच आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला तरी त्यांनी (पक्षनेतृत्वाने) नितीन गडकरींना संधी दिली पाहिजे ना, असे सांगत त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले.
नोटाबंदीने हजारो लोकांना बेरोजगार केले, बलात्कारसारख्या गंभीर गुन्ह्याचे प्रमाणही वाढले आहे. हे कोणते अच्छे दिन आहेत, असा सवालही त्यांनी भाजपाला विचारला. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर बदलतील असे वाटले नव्हते, असेही त्यांनी सांगितले.