मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाण्याचे ठरवले होते. त्यानंतर उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध केला होता. राज ठाकरे उत्तर प्रदेशातील लोकांची माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा बृजभूषण सिंह यांनी दिला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव अयोध्या दौरा स्थगित केला आहे. मात्र त्यांनतरही मनसेचे ठाण्यातील नेते अविनाश जाधव हे आपल्या काही कार्यकर्त्यांसह अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्येत त्यांनी रामलल्लाचे दर्शनही घेतले आहे. अविनाश जाधव यांनी फेसबुक लाईव्ह करून ही माहिती दिली.
“आम्ही बरेच महाराष्ट्र सैनिक अयोध्येत आलो आहोत. रामलल्लांचे दर्शन प्रत्येक हिंदूने घेतले पाहिजे. मी सर्व मराठी माणसांना विनंती करेन की येथे आले पाहिजे. आज पाच तारीख असून एक मराठी माणूस अयोध्येत आला आहे आणि रामलल्लांचे दर्शन घेतले आहे,” असे अविनाश जाधव यांनी फेसबुक लाईव्हमध्ये म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी आज म्हणजे ५ जूनला अयोध्येत जाण्याची घोषणा केली होती. राज ठाकरे यांच्या या दौऱ्याला भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांनी कडाडून विरोध केला होता. उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरे यांना आम्ही अयोध्येत पाऊल ठेऊन देणार नाही, असा इशारा बृजभूषण सिंह यांनी दिला होता.