भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवार, १ जानेवारी रोजी ‘इंडिया२७२+’ मोबाईल अॅप्लिकेशनचे अनावरण करण्यात आले. हे  अॅप्लिकेशन गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध असून अॅन्ड्रॉईड वापरकर्त्यांना ते मोफत डाऊनलोड करता येऊ शकते.

आगामी लोकसभा निवडणुकीत स्वबळावर पूर्ण बहुमत मिळवण्यासाठी हे अॅप्लिकेशन भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि भारत तसेच जगभरातील पक्षाच्या समर्थकांसाठी मोलाची कामगिरी बजावणार आहे. भाजपच्या मुक्त व्यासपीठावर चर्चा करता यावी, आपल्या कल्पना मांडता याव्यात आणि नरेंद्र मोदींच्या आगामी भाषणामध्ये हे अॅप्लिकेशन मोलाची कामगिरी बजावणार आहे, अशी माहिती भाजपतर्फे देण्यात आली आहे.
अॅप्लिकेशनमध्ये लेखक, कलाकार आणि डिझायनर्सपासून ते डॉक्टर, आयटी आणि एनआरआयसाठी वेगळे गट तयार करण्यात आले आहेत. महिलांच्या सक्षमिकरणासाठी तयार करण्यात आलेला विशेष गट हा या अॅल्पिकेशनमधील सर्वात लोकप्रिय गट आहे.
या अॅप्लिकेशनद्वारे भाजपचे कार्यकर्ते फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्स अॅपवर ताज्या घडामोडीही शेअर करू शकणार आहेत.