अँड्रॉइड मोबाइल किंवा ‘टॅबलेट’वर हिंदी, गुजराती, मराठी आदी भाषांतील पुस्तके (ई-बुक्स) वाचता आणि ऐकताही येऊ शकावीत, यासाठी खास तांत्रिक सोयी उपलब्ध करून देण्याचा विडा एका कंपनीने उचलला आहे. ‘नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय ग्रंथ मेळय़ा’त या कंपनीने तशी जाहिरात मोठय़ा प्रमाणावर आरंभली आहे. अर्थात, मोबाइलधारक हे या कंपनीचे किरकोळ ग्राहक असतील, परंतु शिक्षणसंस्थांशी करार करून एकगठ्ठा ग्राहक मिळवण्याकडेही कल दिसतो आहे.
इंग्रजीत ईबुक रीडर, टॅबलेट अशा आकाराने जरा मोठय़ा गॅजेटप्रमाणेच मोबाईलवरही पुस्तके वाचायची सोय आधीपासूनच आहे. भारतीय भाषांतील ई-पुस्तके अनेक निघतातच, पण ती मोबाइलवर वाचता येणे मात्र दुरापास्त होते. हिंदीतील काही पुस्तके नमुन्यादाखल मोबाइलवर आणणाऱ्या या कंपनीबद्दल कुतूहल वाढले, ते मोबाइल-ईबुक्स अन्य भारतीय भाषांतही येणार असल्याने. मराठीआधी सध्यातरी दाक्षिणात्य भाषांनाच प्राधान्य दिले जाणार, असे दिसते.
मोबाइलवर भारतीय भाषांतील पुस्तके-मासिके विकू पाहणाऱ्या या कंपनीचे नाव रॉक्सअ‍ॅप रिटेल प्रा. लि. तिचे संस्थापक संचालक प्रवीण राजपाल यांनी सांगितले की, या ‘इबुक व इमॅगझिन अ‍ॅप्लिकेशन’ एकूण अठरा प्रादेशिक भाषांतील पुस्तके आम्ही डिजिटल रूपात सादर करणार आहोत. अँड्रॉइड फोनवर हे अ‍ॅप्लीकेशन मोफत डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला मोबाइलवर ही पुस्तके वाचता येणार आहेत. नाइट रीडिंग मोड, वेगवेगळे अक्षराकार, टिपणे व तुम्ही वाचून दमलात तर तुम्हाला पुस्तक वाचून दाखवण्याची सोय एवढय़ा सुविधा त्यात दिल्या आहेत असे रॉक्सअ‍ॅपचे डिजिटल हेड ऋषी एम झा यांनी सांगितले. ते म्हणाले की, हे ई-पुस्तक वाचकाकडेच राहील. छापील पुस्तकापेक्षा पुस्तकाच्या डाउनलोडची किंमत खूपच कमी असणार आहे. चाचा चौधरी कॉमिक बुकची किंमत सध्या एक रुपया आहे, असे कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक निखिल चंद्रा यांनी सांगितले. अनेक प्रकाशकांची पुस्तके या स्वरूपात आणण्यासाठी करार करण्याचा सपाटा सध्या या कंपनीने लावला असल्याचेही समजले. मात्र, पुस्तके विकण्यासाठी क्रेडिट कार्डाची मदत न घेता, थेट मोबाइल सेवादार कंपनीला ग्राहकाच्या (पोस्टपेड) बिलातूनच रक्कम वळती करता यावी, अशा व्यवहारासाठी सध्या बोलणी सुरू आहेत. शिवाय, भारतीय भाषांतील ‘आवाज’ संगणकीय स्वरूपातच या पुस्तकांना मिळावेत, यासाठी सुरू असलेल्या तांत्रिक खटपटी काही अंशी बाकी आहेत, त्यामुळे मोबाइलवर हे अ‍ॅप्लिकेशन येण्यास वेळ लागणारच. दुसरीकडे, हेच अ‍ॅप्लिकेशन आकाश टॅबलेटवर उपलब्ध करण्यासाठी सरकारशी बोलणी सुरू आहेत, तसे केल्यास क्रमिक पुस्तकेही त्यावर उपलब्ध करता येतील असे राजपाल यांनी सांगितले.
दिल्लीतील व इतर भागातील तीन हजार शाळांमधून याबाबत जागरूकता वाढवली जाणार आहे असे राजपाल म्हणाले. तसे झाले, तर मुलांना त्यांच्या क्रमिक पुस्तकावर आधारित आभासी परीक्षाही त्यावर देता येणार आहे, त्यातून त्यांची पूर्वतयारी होऊ शकेल. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाशीही कंपनीने याबाबत संपर्क साधला आहे.
काय आहे रॉक्सअ‍ॅप
*  अँड्रॉइड फोनवर मोफत ‘अ‍ॅप’ डाऊनलोड
*  भारतीय भाषांतील ई-पुस्तकांची विक्री
*  किरकोळ बाजारासोबतच शिक्षणक्षेत्राचेही ‘मार्केट’
*  सध्या एकही मराठी पुस्तक नाही!

Story img Loader