चीनचे पंतप्रधान ली केक्वियांग पाकिस्तान भेटीवर येत असून खबरदारीचे उपाय म्हणून अधिकाऱ्यांनी इस्लामाबाद आणि रावळपिंडी येथील मोबाइल सेवा बंद ठेवण्याचे आदश दिले आहेत. ली दोन दिवसांच्या भेटीसाठी बुधवारी पाकिस्तानात येत आहेत.
पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाने सर्व मोबाइल कंपन्यांना एका औपचारिक सूचनेद्वारे रात्री एक वाजेपर्यंत मोबाइल सेवा बंद ठेवण्याचे आदर्श दिले आहेत. हल्ल्यांची योजना आखून त्यावर प्रत्यक्ष कृती करण्यासाठी दहशतवादी मोबाइलचाच वापर करतात, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
इस्लामाबादजवळच्या नूर खान लष्करी हवाई तळापासूनच्या मुख्य मार्गावर आणि पाकिस्तानच्या अध्यक्षांच्या निवासस्थानी कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. पाकिस्तानात आगमन होताच ली केक्वियांग अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांची भेट घेणार आहेत.
मोबाइल सेवा बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याची जनतेची तक्रार आहे. धमक्या आणि काही महत्त्वाच्या दिवशी अधिकारी नियमितपणे मोबाइल सेवा बंद ठेवण्याचे आदेश देतात.