ईदच्या पाश्र्वभूमीवर दहशतवादी हल्ला होऊ नये, याची खबरदारी घेण्यासाठी सुरक्षेचे उपाय म्हणून पाकिस्तानातील सुमारे ६० मोठय़ा व अन्य काही शहरांतील भ्रमणध्वनी सेवा खंडित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
लाहोर, रावळपिंडी, मुलतान, कराची, हैदराबाद, पेशावर आणि क्वेट्टा आदींचा या ६० शहरांमध्ये प्रामुख्याने समावेश असून तेथे पाकिस्तान दूरदळणवळण संबंधितांनी भ्रमणध्वनी सेवा खंडित केली. मात्र याचा फटका इस्लामाबादला बसला नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाकमधील अनेक ठिकाणी दुचाकीवर बंदी घालण्यात आली असून पाठीमागे स्वार बसविण्यावरही र्निबध लादले आहेत. दहशतवादी हल्ल्यासाठी दुचाकीचा वापर करण्यात येतो, असे प्रामुख्याने आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षेचे उपाय म्हणून हजारो पोलीस व निमलष्करी दलाचे कर्मचारी पाकिस्तानात तैनात करण्यात आले आहेत.