आत्महत्येचा खोटा बनाव करुन घरातील वाद शांत करण्याच्या प्रयत्नामध्ये एकाने स्वत:चा जीव गमावल्याची घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे. या घटनेमध्ये एका ३३ वर्षीय सहाय्यक लोको पायलटचा जीव गेला आहे. चंदन कुमार असे या व्यक्तीचे नाव असून तो मूळचा बिहारचा आहे. घरातील कडाक्याच्या भांडणामध्ये तापलेले वातावरण शांत करण्यासाठी म्हणून त्याने आत्महत्त्येचा बनाव केला. गळ्यात साडी अडकवून घरातील सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतानाच फास लागल्याने त्याचा मृत्यू झाला.
घरातील वाद शांत करण्यासाठी आत्महत्त्येचा बनाव
मृत चंदन कुमारला त्याची गोंगाट करणारी मुले आणि त्याच्या आईला शांत करायचे होते. मात्र, त्याच्या या प्रयत्नाचा शेवट अत्यंत हृदयद्रावक झाला आणि त्याला अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागला. गोपालपट्टणममधील कोट्टापलेम परिसरातील गणेश नगर येथे ही घटना घडली. गेल्या पाच वर्षांपासून हे कुटुंब तेथे राहत होते. चंदन कुमार यांच्या पश्चात त्यांची पत्नी लाल मुन्नी कुमारी, दोन सात वर्षांखालील लहान मुले आणि आई असा परिवार आहे.
हेही वाचा : VIDEO : मुलं जेवण करत असतानाच शाळेची भिंत कोसळली, सहा विद्यार्थी जखमी; घटना सीसीटीव्हीत कैद
नेमके काय घडले?
पोलिसांनी या दुर्दैवी घटनेबद्दल सांगितले की, चंदनची मुले घरात गोंगाट करत असताना ही घटना घडली. त्याच्या आणि त्याच्या पत्नीमध्ये जोरदार वाद सुरु झाला होता. त्यानंतर मुन्नी कुमारीने मुलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या सगळ्या गोंधळात उद्भवलेली परिस्थिती शांत करण्यासाठी आणि कुटुंबीयांना धमकावण्यासाठी चंदनने गळ्यात साडी बांधली आणि साडीचे दुसरे टोक सिलिंग फॅनच्या हुकला अडकवले. दुर्दैवाने, साडीचा फास गळ्याला लागून चंदनचा मृत्यू झाला. बेडरूमचा दरवाजा बराच वेळ बंद राहिल्याने मुन्नी कुमारीला काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. स्थानिकांच्या मदतीने तिने दरवाजा तोडला. मात्र, चंदनचे आधीच निधन झाल्याचे त्यांना आढळले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी चंदनच मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि घडलेल्या प्रकाराची चौकशी सुरु केली आहे. सध्या चंदनच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त अन्नेपू नरसिंह मूर्ती यांनी सांगितले की, चंदनने पत्नीसोबत झालेल्या जोरदार वादानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला.