उत्तराखंडचे माजी मंत्री हरकसिंह रावत यांची सून आणि मॉडेलिंग क्षेत्रातून राजकारणाच्या रिंगणात उतरलेल्या अनुकृती गोसाई रावतने काँग्रेस पक्षाला शनिवारी राम राम ठोकला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या लवरकरच भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. वन घोटाळ्याच्या चौकशीसाठी ईडीने मागच्या महिन्यातच अनुकृती आणि त्यांचे सासरे हरकसिंह रावत यांना नोटीस बजावली होती. उत्तराखंड काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करण महरा यांना लिहिलेल्या पत्रात अनुकृती यांनी म्हटले की, वैयक्तिक कारणांमुळे मी पक्ष सोडत आहे. “आज (१६ मार्च) मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे”, अशी भूमिका त्यांनी पत्राद्वारे मांडली. हे पत्र त्यांनी स्वतःच्या इन्टाग्राम अकाऊंटवरही शेअर केले आहे.
उत्तराखंडचे माजी वन मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरकसिंह रावत आणि त्यांच्या सून अनुकृती यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली होती. ७ फेब्रुवारी रोजी उत्तराखंड, नवी दिल्ली आणि हरियाणातील १७ ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. वन घोटाळा प्रकरणात ईडीने पीएमएलए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
माजी वन मंत्री रावत यांनी २०१९ साली पाखरो व्याघ्र राखीव क्षेत्र आणि कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान येथे बेकायदेशीरपणे हजारो झाडे तोडण्यासंदर्भात आदेश दिले होते, तसेच आर्थिक गैरव्यवहार आणि अनधिकृत बांधकाम केल्याचाही त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. रावत हे पूर्वी भाजपामध्ये होते. भाजपा सरकारच्या काळात वनमंत्री असताना त्यांनीच पाखरो व्याघ्र प्रकल्प विकासाचे काम पूर्ण केले होते.
रावत यांचा पुर्वेतिहास पक्ष बदलण्याचा राहिला आहे. १९९१ साली त्यांनी पहिल्यांदा भाजपाच्या तिकीटावर आमदारकी मिळवली होती. एकत्रित उत्तर प्रदेशच्या कल्याण सिंह सरकारमध्ये त्यांनी सर्वात तरूण आमदार म्हणून काम केले होते. त्यानंतर त्यांनी बसपामध्ये प्रवेश केला. १९९८ साली बसपाने त्यांना तिकीट नाकारल्यानंतर रावत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर २००२ आणि २००७ साली काँग्रेसच्या तिकीटावर त्यांनी विधानसभेत विजय मिळवला. २००७ ते २०१२ या काळात रावत विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते.
रावत यांच्या सून अनुकृती या २०१४ सालच्या मिस इंडिया एशिया पॅसिफिक वर्ल्ड या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. तसेच मिस ग्रँड आंतरराष्ट्रीय स्पर्धेत २०१७ त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. २०२२ साली त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात पाऊल ठेवले होते. भाजपाचे आमदार दलीप सिंह रावत यांनी अनुकृती यांचा पराभव केला.