चीनच्या नौदलाचे आधुनिकीकरण अत्यंत वेगाने करण्यात येत असून, भारतासाठी ही मोठय़ा काळजीची बाब आहे, असे सांगतानाच, वादग्रस्त दक्षिण चिनी समुद्रातील आपल्या हिताचे संरक्षण करण्यासाठी भारत तेथे प्रसंगी सैन्यदल पाठवण्यासही मागे-पुढे पाहणार नाही, अशी ग्वाही नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल डी. के. जोशी यांनी दिली. येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या वर्षी दक्षिण चिनी समुद्रातील उपस्थितीवरून भारत आणि चीनमध्ये वाद झाला होता. त्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, त्या भागात सतत जावे अशी काही आमची इच्छा नसते. पण जेव्हा देशाच्या हितसंबंधांचा प्रश्न असतो, उदाहरणार्थ, ‘ओएनजीसी विदेश’चे तेथे काही काम असेल, तेव्हा आम्हाला तेथे जावेच लागेल आणि आमची त्यासाठी तयारी आहे. त्यासाठी आम्ही काही कवायत करतो आहोत का, या प्रश्नाचे थोडक्यात उत्तर ‘होय’ असे आहे, असे ते म्हणाले. त्या भागात जाण्या-येण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. भारतीय हितसंबंधांचाच हा एक भाग आहे, असेही त्यांनी सांगितले.    

Story img Loader