पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान अर्थतज्ज्ञही आहेत त्यामुळे ते अर्थव्यवस्थेला सकारात्मक दिशा देण्यात यशस्वी झाले, असे मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितले. मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडून अर्थशास्त्राचे तासभर धडे घेतले असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले होते त्यावर इराणी यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना एनसीईआरटीची पुस्तके मोबाईल अ‍ॅपवर मोफत उपलब्ध करून दिली जातील असे त्यांनी सांगितले.
त्यांनी वार्ताहरांना सांगितले की, आधीचे पंतप्रधान देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देऊ शकले नाहीत.
राहुल गांधी यांनी असे म्हटले होते की, मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्था खालावत चालल्याचे म्हटल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्याकडून तासभर अर्थव्यवस्थेबाबत धडे घेतले. अर्थव्यवस्था कशी चालवतात हे त्यांनी शिकून घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काही समजत नव्हते. मनमोहन सिंग यांनी त्यांच्या परीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. श्रीमती इराणी म्हणाल्या की, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना सुरू करून पंतप्रधानांनी सामान्य लोकांमध्ये विश्वास जागवला.
कोळसा क्षेत्राबाबत त्यांनी सांगितले की, कोळसा खाणींच्या लिलावातून सरकारी तिजोरीत मोठी भर पडली आहे. यूपीए सरकारच्या काळात रोज दोन कि.मी रस्ते केले जात होते आता आमच्या सरकारच्या राजवटीत रोज ११ कि.मीचे रस्ते केले जात आहेत.