जयपूर येथे अलीकडेच झालेल्या अधिवेशनात तुम्ही दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही, अशी टीका करून गुजरातचे मुख्यमंत्री नरेन्द्र मोदी यांनी रविवारी येथे झालेल्या जाहीर सभेत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार तोफ डागली. ‘कोणतीही व्यक्ती वैयक्तिकरीत्या काही करू शकत नाही’ या राहुल गांधी यांच्या वक्तव्यालाही खुले आव्हान देत राहुल हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मास आले आहेत, असा टोमणाही मोदी यांनी मारला.
येत्या ५ मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ येथे आयोजित केलेल्या सभेत बोलताना मोदींनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि लालबहादूर शास्त्री यांची उदाहरणे दिली. पटेल यांनी भारताच्या संस्थानांचे विलीनीकरण करून भारत एकसंध राखण्याचे कार्य केले तर ‘जय जवान जय किसान’ ची शास्त्रीजींनी दिलेली घोषणा अन्नधान्याच्या उत्पादनांच्या बाबतीत भारताला स्वयंपूर्णतेकडे घेऊन गेली आणि त्यामुळेच भारत अन्नधान्याच्या क्षेत्रात आजही स्वयंपूर्ण झालेला दिसतो, असा दावा मोदी यांनी केला.
निवडणुकीत मोठय़ा मताधिक्याने पराभूत होणारे नेते, गुन्हेगार आणि नेत्यांच्या निकटवर्तीयांना उमेदवारी देण्याचा निर्णय काँग्रेसने जयपूरच्या अधिवेशनात घेतला होता परंतु आपल्याच या निर्णयावर त्यांनी पाणी ओतले आहे, अशी टीका करून कर्नाटकात १५ हजारांच्या मताधिक्याने पराभूत होणाऱ्यांना, गुन्हेगारांना काँग्रेसने उमेदवारी दिली नाही काय, अशी विचारणा मोदी यांनी केली.
भारतात मुले मातांचा आदर करतात. या पाश्र्वभूमीवर ‘सत्ता हे विष आहे’ असे मत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व्यक्त करतात तर त्यांचे सुपुत्र कर्नाटकात आपल्या पक्षाला सत्ता मिळावी अशी इच्छा करतात, असा चिमटा मोदी यांनी काढला.

Story img Loader