लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपने आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात राम मंदिराचा प्रश्न उकरून काढला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे उजवे हात असलेले अमित शहा यांनी शनिवारी प्रथमच अयोध्येतील तात्पुरत्या उभारलेल्या राम मंदिरास भेट दिली. मोदी यांनी अमित शहा यांना सरचिटणीस पदाबरोबरच उत्तर प्रदेशचा कार्यभार दिला आहे.
राम मंदिराच्या प्रश्नाने भाजपला निवडणुकीत फायदा झाला होता व शहा यांच्या भेटीमागे या प्रश्नाला पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न दिसत आहे. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अमित शहा यांनी राम मंदिरास भेट दिल्याचे मानले जात आहे. जगातील हिंदूसाठी हे राम मंदिर म्हणजे मोठे श्रद्धास्थान आहे, अयोध्येत योग्य ठिकाणी भव्य असे राममंदिर उभारण्याचे आपले स्वप्न आहे व ते लवकर पूर्ण व्हावे, अशी आपण प्रार्थना केली, असे शहा म्हणाले.
शहा यांनी इशरत जहांप्रकरणी सीबीआयच्या आरोपपत्रावर उत्तर देण्याचे टाळले. त्या वेळी गुजरातचे गृहमंत्री असलेल्या अमित शहा यांचे नाव इशरत जहांप्रकरणी आरोपपत्रात येण्याची दाट शक्यता आहे. केंद्रात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी उत्तर प्रदेशातील ८० जागांपैकी जास्तीतजास्त जागा मिळवणे भाजपसाठी गरजेचे आहे. या पाश्र्वभूमीवर भाजपने नव्याने राम मंदिराचा राग आळविल्याचे मानले जात आहे.
भाजप सत्तेवर आल्यास ३७० कलम रद्द करणार – शहानवाझ हुसेन
केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यास घटनेतील ३७० कलम रद्द केले जाईल, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते शाहनवाझ हुसेन यांनी शनिवारी प. बंगालमधील हावडा येथे केले. जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याचे अनावरण हुसेन यांच्या हस्ते हावडा जिल्ह्य़ातील मंदिरतळा येथे करण्यात आले. ममता बॅनर्जी यांनी बिगरकाँग्रेस आणि बिगरभाजप आघाडीचा मांडलेला प्रस्ताव अवास्तव आहे. त्या कोणासमवेत आघाडी करणार, मायावती आणि मुलायमसिंह हे उत्तर प्रदेशात काँग्रेससमवेत आहेत, तर बिहारमध्ये नितीशकुमार आणि लालूप्रसादही काँग्रेससमवेत आहेत, असेही हुसेन म्हणाले.