शांती मोहिमांच्या शिखर बैठकीवेळी फक्त एकमेकांना अभिवादन
संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेच्या शिखर बैठकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे समपदस्थ नवाझ शरीफ यांच्यात अनौपचारिक चर्चा होईल अशी अटकळ होती, पण तसे काही घडले नाही. दोन्ही नेत्यांनी केवळ एकमेकांना हात हलवून अभिवादन केले.
शांतिरक्षक मोहिमांबाबत अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी शिखर बैठक आयोजित केली होती, त्यासाठी मोदी व शरीफ उपस्थित होते. शरीफ हे काही मिनिटे उशिरा आले व मोदी यांच्या डाव्या बाजूच्या अंतरावरील एका आसनावर बसले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडे बघून स्मितहास्य केले व हात हलवले. कार्यक्रमाच्या काही मिनिटे अगोदर शरीफ यांनी पुन्हा हात केला तेव्हा मोदीही हसले व हात हलवून प्रतिसाद दिला. मोदी यांनी पुन्हा हात हलवला तेव्हा शरीफ हसले व मान हलवून प्रतिसाद दिला. या व्यतिरिक्त दोन्ही नेत्यांमध्ये काहीच घडले नाही. शिखर बैठक सुरू होण्याच्या काही मिनिटे अगोदर दोन्ही नेते सभागृहात आले होते. त्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले नाही पण दोघांनीही एकमेकांच्या भाषणानंतर टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.
शरीफ यांच्या बाजूला बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद बसलेल्या होत्या. रवांडा व इथिओपियाचे नेतेही बसले होते. मोदी यांच्या बाजूला संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून व जपानचे पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबे बसलेले होते. फ्रान्स व इंडोनेशियाचे नेतेही होते. भाषणानंतर मोदी लगेच निघून गेले. त्यांनी कुणाही नेत्याशी हस्तांदोलन केले नाही. शरीफ यांनी मोदी यांच्यानंतर १०-१५ मिनिटांनी सभागृह सोडले. शरीफ व मोदी यांचे वास्तव्य एकाच हॉटेलमध्ये होते. दोघा नेत्यांची पूर्वीची भेट जुलैत ब्रिक्स परिषदेवेळी रशियातील उफा येथे झाली होती.