पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोघेही देशाची गळचेपी करत आहेत असा आरोप राज ठाकरेंनी नांदेड येथील सभेत केला. जनतेने मोठ्या अपेक्षेने देश यांच्या हातात दिला मात्र नरेंद्र मोदी फक्त थापा मारत राहिले. प्रचार करताना भाषणात बोलण्यासाठी मोदींकडे मुद्देही राहिलेले नाहीत त्यामुळे ते नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या गोष्टी सांगत आहेत. त्याच्याशी आम्हाला काय करायचं आहे? प्रधानसेवक हूँ हे वाक्यही पंडित नेहरू यांचेच आहे असाही आरोप राज ठाकरेंनी केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नांदेडमध्ये सभा घेतली. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. तसेच मोदी शाह यांच्या जोडगोळीला सत्तेवरून हाकला असेही आवाहन राज ठाकरेंनी केले. निवडणुकांच्या वेळी हे प्रश्न विचारतात की भगतसिंग जेव्हा तुरुंगात होते तेव्हा काँग्रेसचे कोणी नेते त्यांना भेटायला गेले होते का? असा प्रश्न नरेंद्र मोदींनी विचारला होता. त्याचे उत्तरही राज ठाकरेंनी दिले, पंडित जवाहरलाल नेहरूंनी दोनवेळा भगतसिंग यांची भेट घेतली होती. मात्र हे नरेंद्र मोदींना ठाऊक नाही कारण त्यांचा इतिहास कच्चा आहे असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातच किती गंभीर प्रश्न आहेत. नोकऱ्यांच्या प्रश्न गंभीर आहे, संधी निर्माण होत आहेत मात्र महाराष्ट्रात बाहेरची माणसं येऊन त्या संधी मिळवत आहेत असाही आरोप राज ठाकरेंनी केला. ज्या प्रकारे शाह-मोदी ही जोडगोळी देशाला घेऊन चालली आहे ती रशियाची पद्धत आहे. देशातल्या सगळ्या गोष्टींचं वर्चस्व या लोकांना हवं आहे. तुम्हाला अमित शाह आणि मोदींचे गुलाम म्हणून जगायचं आहे का? असाही प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. रेडिओवर मन की बात ही देखील कॉपी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हिटलरची कॉपी करत आहेत कारण हिटलर रेडिओवर बोलत असे. त्यावरूनच मन की बात चा फंडा मोदींनी पुढे आणला असाही आरोप राज ठाकरेंनी केला.